‘देश संविधानाने चालेल, मनमानीने नाही!’ नागपुरात CJP ची संविधान बचाव रॅली; अभिजीत दिपके यांचा केंद्र सरकारवर घणाघात

Date:

संविधान दिनी चार हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग असल्याचा आयोजकांचा दावा; अभिनेते प्रकाश राज यांची उपस्थिती, विदर्भ-मराठवाड्यात सहा दिवसांचा जनसंवाद दौरा

नागपूर : संविधान दिनानिमित्त कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) वतीने नागपूर येथील संविधान चौकात गुरुवारी (२६ नोव्हेंबर) ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’ या अभियानांतर्गत जाहीर सभा आणि आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात चार हजारांहून अधिक नागरिक, विद्यार्थी आणि तरुण सहभागी झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.

CJP चे संस्थापक अभिजीत दिपके आणि सहसंयोजक आशुतोष रांका यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सभेला प्रसिद्ध अभिनेते तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राज आणि रॅप कलाकार विपीन तातड उपस्थित होते. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूलभूत मूल्यांच्या संरक्षणाचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

सभेपूर्वी अभिजीत दिपके आणि आशुतोष रांका यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. संविधान चौकातील कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. विपीन तातड यांनी लोकशाही आणि संविधानिक अधिकारांवर आधारित रॅप गीते सादर केली.

यावेळी देशासाठी बलिदान देणाऱ्यांसह मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद आणि मृतांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

रोजगार, आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर दिपके आक्रमक

सभेला संबोधित करताना अभिजीत दिपके यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. जात, धर्म आणि सामाजिक प्रतिष्ठेचा भेद न करता प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देण्याचे काम संविधानाने केले. त्यामुळेच चहा विकणारी व्यक्तीदेखील देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकली, असे ते म्हणाले.

रोजगार, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला.

गेल्या १२ वर्षांतील स्वतःच्या कारभाराची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी सरकार अजूनही पंडित जवाहरलाल नेहरू यांना दोष का देत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या व्यक्तींना मंत्रिपदे आणि विधिमंडळात स्थान कसे मिळते, असा प्रश्न त्यांनी विचारला.

बोस्टन विद्यापीठातील आपल्या पदवीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी पंतप्रधानांची पदवी सादर करावी, असे आव्हानही दिपके यांनी दिले.

दिल्लीच्या कोणत्याही तख्तापुढे महाराष्ट्र झुकला नाही आणि झुकणारही नाही – दिपके

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत अभिजीत दिपके म्हणाले, “देश संविधानाने चालेल, कोणाच्या मनमानीने नाही. माझ्याविरोधात, आशुतोष किंवा सौरव यांच्याविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी झाले तरी ही चळवळ थांबता कामा नये. कारण ‘आम्ही भारताचे लोक’ हीच या चळवळीची खरी ताकद आहे. शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र दिल्लीच्या कोणत्याही तख्तापुढे कधी झुकला नाही आणि यापुढेही झुकणार नाही.”

निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता, मतचोरी आणि सहकारी संस्थांमधील राजकीय हस्तक्षेपावरही दिपके यांनी प्रश्न उपस्थित केले.

२०४७ मधील भारत कसा असेल, हे तरुण ठरवतील – आशुतोष रांका

CJP चे सहसंयोजक आशुतोष रांका यांनी संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत विविध सामाजिक घटक आणि विचारधारांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी आणि विविध विचारप्रवाहांना सामावून घेणारे संविधान हीच प्रत्येक नागरिकाची मार्गदर्शक विचारधारा असली पाहिजे, असे ते म्हणाले.

संविधान कितीही चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी करणाऱ्यांची भूमिका चुकीची असेल, तर संविधान अपयशी ठरू शकते, या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इशाऱ्याची आठवण त्यांनी करून दिली.

विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनांवरील पोलिस कारवाईचा त्यांनी निषेध केला. CJP चे सहसंयोजक सौरव दास यांना डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

“आम्ही केवळ देश वाचविण्याची भाषा करत नाही, तर देश घडविण्याची भाषा करत आहोत. २०४७ मधील भारत कसा असेल, हे देशातील तरुण ठरवतील,” असे रांका म्हणाले.

जंतरमंतरवरील आंदोलनांवर निर्बंध आणले तरी देशातील प्रत्येक शहरात आणि गावात लोकशाही मार्गाने आवाज उठविणारी नवी व्यासपीठे निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले.

संविधान दिनीच संविधान वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ का? – प्रकाश राज

अभिनेते प्रकाश राज यांनी आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली. संविधान दिनीच नागरिकांना संविधानाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही परिस्थिती का निर्माण झाली, असा सवाल त्यांनी केला.

रोजगार आणि आरोग्यासारखे प्रश्न कायम असताना सरकारच्या प्राधान्यक्रमांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सायंकाळी पाचनंतर झालेल्या मतदानाच्या आकडेवारीबाबतही त्यांनी निवडणूक आयोगाकडे प्रश्न उपस्थित केले.

समाजात फूट पाडणाऱ्या राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी तरुणांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांशी आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

संविधानाची ताकद नागरिकांना समजल्यास लोकशाही अधिक मजबूत होईल. हा दीर्घकालीन संघर्ष असून त्यातून माघार घेणार नसल्याचे प्रकाश राज यांनी सांगितले.

विदर्भ-मराठवाड्यात सहा दिवसांचा ‘क्या बोलती पब्लिक’ दौरा

नागपूरच्या सभेनंतर CJP च्या वतीने विदर्भ आणि मराठवाड्यात सहा दिवसांचा जनसंवाद दौरा आयोजित करण्यात आला आहे. गोव्यातून सुरू झालेल्या ‘क्या बोलती पब्लिक’ या अभियानाचा विस्तार या दौऱ्याच्या माध्यमातून केला जाणार आहे.

विदर्भात तीन दिवस आणि मराठवाड्यात तीन दिवस CJP चे प्रतिनिधी शेतकरी, शेतमजूर, महिला, बेरोजगार तरुण आणि स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.

दुष्काळ, पाणीटंचाई, शेतीचे संकट, बेरोजगारी आणि मूलभूत सुविधांचा अभाव यांसारख्या प्रश्नांचे वास्तव जाणून घेऊन ते सार्वजनिक चर्चेत आणण्याचा या अभियानाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

महाराष्ट्रानंतर राजस्थान, दिल्ली, केरळ, ईशान्य भारत, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशातही या अभियानाचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.

सत्तेसाठी नव्हे, संविधानिक अधिकारांसाठी संघर्ष – CJP

धार्मिक आणि सामाजिक भेद विसरून नागरिकांनी एकत्र यावे, आपल्या संविधानिक अधिकारांची माहिती घ्यावी आणि शांततामय मार्गाने लोकशाहीच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सभेत करण्यात आले.

लोकशाहीमध्ये नागरिक केवळ प्रेक्षक नसून तेच खरे मालक आहेत. आपला संघर्ष राजकीय सत्तेसाठी नसून लोकशाही, संविधानिक मूल्ये आणि सामान्य नागरिकांच्या अधिकारांसाठी असल्याची भूमिका CJP ने या सभेत मांडली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनधारकांना वाहन हस्तांतरणासह विविध कामांवर निर्बंध

पुणे, दि. २७: राज्यातील सर्व वाहनांना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार...

पुणे पोलिसांना थेट सवाल..! गुन्हेगारांना रोखणार कोण? न्यायालयाच्या दारातही नागरिक सुरक्षित नाहीत का?

पुणेकरांना आश्वासन नको, सुरक्षिततेची खात्री हवी; पुणे बार असोसिएशनचे...

आंतरराष्ट्रीय सर्कस महोत्सव ;लोकाग्रहास्तव बालेवाडी- हाय स्ट्रीट येथे नव्याने सुरु !

पुणे-व्हिएतनाम, मेक्सिको, इथिओपिया ,नेपाळ आणि भारत या ५ देशांमधील...