कात्रज, धनकवडी, सहकारनगर आणि बिबवेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये अतिक्रमण कारवाईबाबत प्रचंड उत्सुकता; कागदोपत्री असलेली रस्त्याची रुंदी प्रत्यक्षात मिळणार का?
पुणे : शहरात महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेबाबत कात्रज, धनकवडी, सहकारनगर आणि बिबवेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. धनकवडीतील संभाजीनगर परिसरातील रस्ता अतिक्रमणांमुळे अरुंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज महापालिकेने पदपथावरील तसेच रस्त्याच्या दिशेने पुढे सरकलेली अतिक्रमणे हटवून रस्ता पुन्हा रुंद करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या कारवाईनंतर आता खरा प्रश्न उपस्थित होत आहे. कागदोपत्री हा रस्ता जेवढा रुंद दाखविण्यात आला आहे, तेवढा तो प्रत्यक्षात मोकळा होणार काय? वाहनचालकांना वाहतुकीसाठी पुरेशी जागा आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी हक्काचे पदपथ उपलब्ध होणार काय?
अतिक्रमणे हटविली; पण सातत्य राखणार का?
अतिक्रमणांवर कारवाई करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच हटविलेल्या अतिक्रमणांना पुन्हा त्याच ठिकाणी उभे राहण्यापासून रोखणेही आवश्यक आहे. आजच्या कारवाईनंतर महापालिका प्रशासन या परिसरावर नियमित लक्ष ठेवणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
रस्त्याची अधिकृत रुंदी महापालिकेने जाहीर करावी!
संभाजीनगर येथील रस्त्याची मंजूर रुंदी नेमकी किती आहे? प्रत्यक्षात वाहतुकीसाठी किती रुंदी उपलब्ध आहे? आजच्या कारवाईत किती क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले? याबाबत महापालिका प्रशासनाने स्पष्ट माहिती दिल्यास कारवाईची परिणामकारकता नागरिकांना समजू शकेल.
केवळ अतिक्रमणे हटविण्यापुरती ही मोहीम मर्यादित न राहता रस्ते आणि पदपथ कायमस्वरूपी मोकळे करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
आजच्या कारवाईमुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता महापालिका या अपेक्षांना न्याय देणार की काही दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होणार, याकडे कात्रज, धनकवडी, सहकारनगर आणि बिबवेवाडी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

