मूळ थकबाकीत २० टक्क्यांपर्यंत सवलत; व्याज, विलंब आकार आणि पुनर्जोडणी शुल्क पूर्णपणे माफ; ‘अर्ली बर्ड’ सवलतीसाठी १५ डिसेंबरपर्यंत संधी
मुंबई, दि. २७ नोव्हेंबर : कायमस्वरूपी किंवा तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या बिगरकृषी वीजग्राहकांना थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या ‘अभय योजना २०२६-२७’ला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या २० दिवसांत राज्यातील ५४ हजार ३२५ वीजग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. दरम्यान, मूळ थकबाकीमध्ये २० टक्क्यांपर्यंत सवलत देणाऱ्या विशेष ‘अर्ली बर्ड’ योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
लघु व उच्चदाबाच्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच अन्य बिगरकृषी वीजग्राहकांना दिलासा देणारी ही अभय योजना १५ जानेवारी २०२७ पर्यंत सुरू राहणार आहे.
व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ!
अभय योजनेअंतर्गत वीजग्राहकांच्या एकूण थकबाकीवरील संपूर्ण व्याज, विलंब आकार तसेच मागणी आकार आणि स्थिर आकार १०० टक्के माफ करण्यात येत आहेत. याशिवाय ग्राहकांच्या मागणीनुसार नवीन वीजजोडणी किंवा पुनर्जोडणी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सर्व पात्र ग्राहकांसाठी नवीन वीजजोडणी आणि पुनर्जोडणी शुल्क, तसेच लघुदाब ग्राहकांसाठी सर्व्हिस कनेक्शन शुल्कही पूर्णपणे माफ करण्यात येत आहे. मूळ थकबाकीची रक्कम एकरकमी अथवा व्याजमुक्त हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
१५ डिसेंबरपर्यंत थकबाकी भरल्यास विशेष सवलत
अभय योजनेअंतर्गत १५ डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना विशेष ‘अर्ली बर्ड’ सवलत देण्यात येत आहे.
- लघुदाब घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना वीजजोडणी खंडित राहण्याच्या कालावधीनुसार १० ते २० टक्क्यांपर्यंत सवलत.
- अन्य लघु व उच्चदाब ग्राहकांना १० ते १५ टक्क्यांपर्यंत सवलत.
- व्याज, विलंब आकार, मागणी आकार आणि स्थिर आकार पूर्णपणे माफ.
- नवीन वीजजोडणी आणि पुनर्जोडणी शुल्कात संपूर्ण माफी.
प्रीपेड स्मार्ट मीटर स्वीकारल्यास आणखी पाच टक्के सवलत!
२० किलोवॉटपर्यंत मंजूर वीजभार असलेल्या ग्राहकांनी पुनर्जोडणीच्या वेळी ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’चा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीमध्ये आणखी पाच टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे. या सवलतीची रक्कम संबंधित ग्राहकाच्या प्रीपेड मीटर खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
कोकणातून सर्वाधिक प्रतिसाद; पुणे विभागातील १३ हजारांहून अधिक ग्राहक सहभागी
महावितरणच्या अभय योजनेत आतापर्यंत राज्यभरातील ५४ हजार ३२५ थकबाकीदार वीजग्राहकांनी सहभाग घेतला आहे. सहभागी ग्राहकांच्या संख्येत कोकण प्रादेशिक विभाग आघाडीवर आहे.
प्रादेशिक विभागनिहाय प्रतिसाद :
| प्रादेशिक विभाग | सहभागी ग्राहक | थकबाकीचा भरणा |
|---|---|---|
| कोकण | १९,६२८ | १ कोटी ८६ लाख रुपये |
| छत्रपती संभाजीनगर | १६,०८२ | २ कोटी ५७ लाख रुपये |
| पुणे | १३,२२६ | २ कोटी ५२ लाख रुपये |
| नागपूर | ५,३८९ | १ कोटी ३४ लाख रुपये |
घरबसल्या करता येणार अर्ज
अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या बिगरकृषी ग्राहकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. विशेषतः मूळ थकबाकीमध्ये अतिरिक्त सवलत मिळविण्यासाठी १५ डिसेंबरपूर्वी एकरकमी भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महत्त्वाच्या तारखा :
- ‘अर्ली बर्ड’ विशेष सवलतीची अंतिम मुदत – १५ डिसेंबर २०२६.
- अभय योजनेची अंतिम मुदत – १५ जानेवारी २०२७.

