पुण्यात बिसलेरीच्या बाटलीसारखे सहज मिळतात ड्रग्ज; माणसे मारली जात असताना सरकार अतिक्रमणाच्या चर्चेत व्यस्त : सतेज पाटील

Date:

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरही गंभीर सवाल; डिलिमिटेशनचे ‘गाजर’ स्वीकारणे म्हणजे लहान पक्षांनी स्वतःचाच खड्डा खणण्यासारखे!

पुणे : पुण्यातील वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांचा सुळसुळाट आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शुक्रवारी (२७ नोव्हेंबर २०२६) पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शहरातील कायदा-सुव्यवस्थेसह आगामी संसदेच्या विशेष अधिवेशनातील मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारलाही लक्ष्य केले.

“पुण्यात आज कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, जशी बिसलेरीची पाण्याची बाटली सहज मिळते, तसे पुण्यात ड्रग्ज मिळत आहेत. एकीकडे पुण्यात माणसे मारली जात आहेत आणि सरकार मात्र अतिक्रमणाच्या चर्चा करत बसले आहे,” असा टोला सतेज पाटील यांनी लगावला.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुण्यापुरत्याच का?

पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पद्धतीवरही सतेज पाटील यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. पुणे ग्रामीणमधील अधिकारी पुणे शहरात येतात, तर शहरातील अधिकारी ग्रामीण भागात किंवा दहशतवादविरोधी पथकात (एटीएस) जातात. मात्र, अधिकारी पुण्याबाहेर जात नसल्याचे चित्र दिसत आहे, असे ते म्हणाले.

अधिकाऱ्यांच्या या सोयीच्या बदल्या ही गृहमंत्र्यांची ‘ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बचत’ आहे की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पोलीस अधिकारी कुठे राहतात, यापेक्षा ते आपले कर्तव्य कशा पद्धतीने बजावतात आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था कशी राखतात, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.

अतिक्रमणाच्या चर्चेपेक्षा नागरिकांच्या जीवाला प्राधान्य द्या!

पुण्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे सांगत पाटील यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शहरातील रस्त्यांवर माणसे मारली जात असताना प्रशासन अतिक्रमणाच्या विषयावर चर्चा करण्यात व्यस्त आहे. नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला आरक्षणापेक्षा सरकारला मतदारसंघ वाढविण्यात अधिक रस!

३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही सतेज पाटील यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

२०२३ मध्ये संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले, त्यावेळी काँग्रेसने एकमुखाने पाठिंबा दिला होता. महिला आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणीही काँग्रेसने केली होती. मात्र, सध्याच्या सरकारचे प्राधान्य महिला आरक्षणाची अंमलबजावणी नसून मतदारसंघांची संख्या वाढविणे असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

डिलिमिटेशनचे ‘गाजर’ म्हणजे लहान पक्षांनी स्वतःचाच खड्डा खणण्यासारखे!

मतदारसंघ पुनर्रचनेचा कायदा मंजूर झाल्यानंतर त्याची नियमावली तयार करण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे असतील. त्यातून भविष्यात नेमकी कोणती परिस्थिती निर्माण होईल, याची कोणालाही शाश्वती नाही, असे पाटील म्हणाले.

डिलिमिटेशनचे ‘गाजर’ स्वीकारणे म्हणजे देशातील लहान राजकीय पक्षांनी स्वतःचाच खड्डा खणून घेण्यासारखे असल्याची टिप्पणी त्यांनी केली.

सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ‘इंडिया’ आघाडीसोबतच राहतील!

खासदार सुप्रिया सुळे यांच्या अलीकडील विधानांवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवरही सतेज पाटील यांनी भाष्य केले. सुप्रिया सुळे यांची अधिकृत भूमिका समोर येईपर्यंत ‘जर-तर’च्या चर्चांवर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वी झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आघाडीसोबत राहण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या दिल्ली पातळीवर आघाडीतील घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू असून, ३० नोव्हेंबरच्या अधिवेशनात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे पाटील म्हणाले.

सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ‘इंडिया’ आघाडीसोबतच राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांनाही सतेज पाटील यांनी पूर्णविराम दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अतिक्रमणे हटवताय, पण पुण्यातील पदपथांचे ऑडिट केले का? विरोधी पक्षनेते निलेश निकम यांचा आयुक्तांना सवाल!

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार रस्ते सुरक्षेसाठी अंदाजपत्रकातील एक टक्का निधी...

पुण्यात महिलांना सुरक्षित वाटत नाही; भिडेवाडा स्मारकाबाबतही सरकारची अनास्था : सतेज पाटील

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला काँग्रेसकडून अभिवादन; भाजप सरकारवर...