रामनगर, बावधन खुर्द, पाटीलनगरसह पौड रस्ता परिसराची आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
पुणे : शहरातील सार्वजनिक स्वच्छता आणि अतिक्रमणांच्या प्रश्नांकडे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) त्यांनी कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील विविध परिसरांना प्रत्यक्ष भेट देत स्वच्छता आणि अतिक्रमणविषयक कामकाजाची पाहणी केली. यावेळी अस्वच्छता दूर करण्यासह अनधिकृत अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आयुक्तांनी रामनगर, बावधन खुर्द, पाटीलनगर, सिद्धार्थनगर, इंदिरानगर तसेच पौड रस्ता परिसराची पाहणी केली. मोकळ्या भूखंडांवरील अस्वच्छता, वारंवार कचरा साचणारी ठिकाणे, पालापाचोळा, बांधकामाचा राडारोडा आणि अन्य कचरा तातडीने हटविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
स्वच्छतेसह अतिक्रमणांवरही कारवाईचे निर्देश
परिसरातील सर्व क्रॉनिक स्पॉटची स्वच्छता करणे, मोकळ्या भूखंडांवरील अस्वच्छतेबाबत आवश्यक कार्यवाही करणे, तसेच अनधिकृत अतिक्रमणांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
परिमंडळ क्रमांक दोनचे उपायुक्त, कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक यांना आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आयुक्तांच्या पाहणीनंतर यंत्रणा कामाला
आयुक्तांच्या निर्देशानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत सार्वजनिक स्वच्छतेची आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
शहरातील अतिक्रमणांविरोधात महापालिकेची धडक मोहीम सुरू असतानाच आता आयुक्तांनी सार्वजनिक स्वच्छतेच्या कामकाजाचीही प्रत्यक्ष पाहणी सुरू केली आहे. त्यामुळे स्वच्छता आणि अतिक्रमण निर्मूलनाच्या कामात सातत्य राखण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांवर राहणार आहे.

