पुणे, : समाजातील सर्व घटकांमध्ये समानता, एकोपा आणि सौख्य नांदावे, प्रत्येकाला समान न्याय व समान अधिकार मिळावा, अशी प्रार्थना शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधान परिषद सदस्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री गणरायाच्या चरणी केली. महिला न्याय, समानता आणि सक्षमीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी संवेदनशीलतेने आणि परस्पर सहकार्याने पुढे जाणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. गोऱ्हे यांनी बुधवारी पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींसह प्रमुख गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. कसबा गणपतीपासून त्यांच्या ‘पुणे गणेश वंदन दौऱ्या’ला प्रारंभ झाला. त्यानंतर त्यांनी तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती व दत्त मंदिर, मंडई गणपती आणि केसरीवाडा गणपतीचे दर्शन घेतले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आरती केली, प्रसाद अर्पण केला आणि महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्य, सुख-समृद्धी, सुरक्षितता व प्रगतीसाठी प्रार्थना केली.
या दौऱ्यात डॉ. गोऱ्हे यांच्या भगिनी तथा स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, महिला संपर्कप्रमुख कांता पांढरे, शहरसचिव संदीप शिंदे, युवासेना महानगरप्रमुख अमित बागुल, ओमकार आढाव, गायत्री भागवत, तुषार भांबरे, मीरा तुपेरे, सायली पवार, राजू विटकर आणि अनिता शिंदे यांच्यासह शिवसेना, युवासेना व शिवसेना महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्याची माझी अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. गणेशोत्सवामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशभक्तांमध्ये उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि यश प्राप्त व्हावे तसेच समाजात समानता, एकोपा आणि सौख्य नांदावे, अशी प्रार्थना मी श्री गणरायाच्या चरणी केली,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
गणेशोत्सव उत्साहाने साजरा करताना पर्यावरणाचे भान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. ध्वनी, पाणी आणि हवा प्रदूषण टाळून शक्य तितक्या पर्यावरणपूरक व निरामय पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांना केले.
गणेशोत्सवाच्या काळात दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. पोलिस प्रशासन, गणेशोत्सव मंडळे, महिला स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांनी परस्पर समन्वयातून महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महिलांबरोबरच युवक आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षण, रोजगार व स्पर्धा परीक्षांशी संबंधित समस्या प्राधान्याने सोडविण्यात याव्यात. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होऊन त्यांच्या जीवनात स्थैर्य आणि समृद्धी यावी, यासाठीही आपण श्री गणरायाकडे प्रार्थना केल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती मिळावी तसेच जनहिताची कामे प्रभावीपणे व्हावीत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
देवस्थानांची विकासकामे दर्जेदार आणि कालबद्ध व्हावीत
राज्यातील विविध देवस्थानांच्या विकासासाठी सुरू असलेली कामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. पंढरपूर येथील रुक्मिणीमातेच्या मूर्तीच्या चरणांची झीज झाल्यामुळे पुरातत्त्व विभागाकडून सुरू करण्यात आलेले संवर्धनाचे काम लवकर आणि योग्य पद्धतीने पूर्ण व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी केली.
दगडूशेठ गणपतीशी तीस वर्षांचे भावनिक नाते
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनानंतर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “जवळपास तीस वर्षांपासून मी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येत आहे. बाप्पांचे बोलावणे येते आणि त्यानुसार अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात व लोकहिताची कामे घडत जातात, अशी माझी दृढ श्रद्धा आहे.”
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने महिलांना एकत्र आणून सुरू केलेल्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाच्या परंपरेचे त्यांनी विशेष कौतुक केले. या उपक्रमामुळे महिलांचा आध्यात्मिक आणि सामाजिक सहभाग वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
“पुण्यात यशस्वीपणे सुरू असलेल्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाच्या उपक्रमाला आता राज्यव्यापी स्वरूप द्यावे. महाराष्ट्रातील विविध गणेशोत्सव मंडळांशी संबंधित महिलांना ऑनलाइन पद्धतीने एकत्र आणून अथर्वशीर्ष पठणाचे प्रशिक्षण देता येईल. अष्टविनायक दर्शन दौऱ्यादरम्यानही अनेक महिलांनी अशी इच्छा व्यक्त केली होती. पुढील वर्षापासून याबाबत नियोजनबद्ध काम करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याची व्याप्ती सातत्याने वाढत असल्याबद्दल त्यांनी मंडळाचे विश्वस्त, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
“आपल्या आराध्य दैवतांची बदनामी करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात आहे. मात्र पुण्यातील गणेशभक्तांचा हा जनसागर अशा प्रवृत्तींना योग्य उत्तर देणारा आहे. समाजातील जबाबदार व्यक्तींनी लोककल्याणाच्या मार्गाने काम केल्यास सर्वसामान्य नागरिकांनाही योग्य दिशा मिळते,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
“मला पाचव्यांदा महाराष्ट्र विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली, ही श्री गणरायाची कृपा, उपमुख्यमंत्री तथा मुख्यनेते शिवसेना ना.श्री एकनाथ शिंदे यांनी दाखविलेला विश्वास आणि जनतेने दिलेल्या आशीर्वादाचे फलित आहे. या संधीच्या माध्यमातून महिला, युवक, विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा माझा प्रयत्न कायम राहील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
गणेश वंदन दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे शिवसेना, युवासेना आणि शिवसेना महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, गणेशोत्सव मंडळांचे विश्वस्त, स्वयंसेवक तसेच पुणे शहर पोलिसांचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मनापासून आभार मानले.

