सुरुवातीचा ₹१५ लाखांचा दर चर्चेनंतर कमी; गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी महापालिकेची व्यवस्था
पुणे : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात पुणे महापालिका हद्दीत विसर्जित होणाऱ्या गणेशमूर्ती तसेच दुर्गादेवीच्या मूर्तींचे सन्मानपूर्वक पुनर्विसर्जन करण्यासाठी महापालिका खाण भाडेतत्त्वावर घेणार आहे. यासाठी मागविण्यात आलेल्या कोटेशनमध्ये सर्वांत कमी दर देणाऱ्या भावडी येथील खाणमालक सोमनाथ तांबे यांच्याकडून २५ दिवसांसाठी खाण घेण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
या कामासाठी सुरुवातीला ₹१५ लाखांचा दर सादर करण्यात आला होता. मात्र महापालिका प्रशासनाने संबंधित खाणमालकाशी चर्चा केल्यानंतर हा दर कमी करून ₹१२ लाख ५० हजार करण्यात आला. त्यानुसार फेरदर स्वीकारून खाण भाड्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, गणेशोत्सव २०२६च्या काळात शहरातील विविध विसर्जन ठिकाणांवरून जमा होणाऱ्या मूर्तींचे पुढील पुनर्विसर्जन करण्यासाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता असते. याच उद्देशाने खाण उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.
खाणमालकाने महापालिकेला दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी खाणीच्या भाड्यात साधारण १५ टक्के वाढ होत असते. मागील वर्षी दरवाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे यंदाच्या दरात दोन वर्षांची वाढ तसेच दुर्गादेवी महोत्सवासाठी वाढणाऱ्या पाच दिवसांचा कालावधी विचारात घेऊन ₹१५ लाखांचे कोटेशन देण्यात आले होते. मात्र महापालिकेच्या विनंतीनंतर कमी दरात काम करण्याची तयारी दर्शविण्यात आली.
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हे संवेदनशील धार्मिक उत्सव असल्याने मूर्तींच्या पुनर्विसर्जनाची व्यवस्था वेळेत करणे आवश्यक असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाने नमूद केले आहे. त्यामुळे ₹१२.५० लाखांच्या सुधारित दराने २५ दिवसांसाठी खाण भाडेतत्त्वावर घेण्यास विभागाने हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या कामासाठी आवश्यक आर्थिक तरतूद घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे उपलब्ध असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.

