पुणे:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बुधवारी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.
मुंबईतील निवासस्थानी परतल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात नियमित तपासण्यासाठी त्यांना दाखल केल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर सांगितले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “पुढील तपासण्यांसाठी बाबांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करत आहोत. तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या सदिच्छांबद्दल आभारी आहोत.”
तत्पूर्वी शरद पवार यांना खोकला आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने सोमवारी (२ नोव्हेंबर) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. येथील उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ के. ग्रँट यांनी दिली होती.
रुबी रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. “बाबांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो आहोत. रुबी हॉलच्या संपूर्ण टीमने योग्य रितीने काळजी घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते”, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली होती.
दिवाळीनिमित्त दरवर्षी पवार कुटुंबिय बारामतीमध्ये एकत्र येत असतात. सर्व पिढ्याचे सदस्य दिवाळीनिमित्त एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. तसेच पाडव्याच्या दिवशी शरद पवार राज्यभरातील हितचिंतक, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा स्वीकारत असतात. मात्र यावर्षी जानेवारी महिन्यात अजित पवारांचे अपघाती निधन झाल्यानंतर पवार कुटुंबिय दिवाळी साजरी करणार नसल्याची माहिती विठ्ठल मणियार यांनी रुबी हॉल रुग्णालयाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना दिली. शरद पवारही दिवाळीत बारामती ऐवजी मुंबईत थांबतील, असेही ते म्हणाले.

