१५ सप्टेंबरपासून ‘मुंबई चलो’ची हाक; आझाद मैदानातील १९ सप्टेंबरच्या उपोषणाला पोलिसांची परवानगी नाकारली
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १५ सप्टेंबरपासून ‘मुंबई चलो’ आंदोलनाची हाक देणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा जोरदार टीका केली आहे. “सरकारला गोरगरिबांची कदर नाही. आम्ही सरकारला तीन वर्षे संधी दिली. आता काय व्हायचे ते मुंबईतच होणार. आम्हाला जेलमध्ये टाकले तरी चालेल; पण आंदोलन थांबणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
जरांगे पाटील यांनी १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यासाठी परवानगी मागितली होती. आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येईल आणि पोलिसांनी घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन केले जाईल, असे हमीपत्रही देण्यात आले होते. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.
पोलिसांनी परवानगी का नाकारली?
दक्षिण मुंबईतील शाळा, रुग्णालये, व्यावसायिक आस्थापने, न्यायालयीन कामकाज, सार्वजनिक वाहतूक आणि आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र आल्यास सार्वजनिक सुव्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही कारण देण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठी गर्दी असते आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांवर अतिरिक्त जबाबदारी असते. यापूर्वी झालेल्या जरांगे यांच्या आंदोलनावेळी मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईच्या रस्त्यावर उतरल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता, याचाही उल्लेख पोलिसांकडून करण्यात आला.
‘सरकारकडे अजून आठ दिवस आहेत’
जरांगे पाटील यांनी सरकारला निर्णयासाठी आणखी आठ दिवसांची मुदत असल्याचे सांगितले. राज्यातील पाऊस आणि शेतीच्या कामांचा संदर्भ देत त्यांनी मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत येणार असल्याचा दावा केला.
“शेतीची पेरणी आणि मशागतीची कामे आता संपली आहेत. पाऊसही सुरू झाला आहे. त्यामुळे मराठा बांधव शांततेत आणि मोठ्या संख्येने मुंबईत येणार आहेत. सरकारकडे अजून आठ दिवसांची संधी आहे; त्यांनी निर्णय घ्यावा,” असे त्यांनी सांगितले.
बावनकुळेंवरही निशाणा
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जरांगे पाटील यांनी टीका केली. त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित चौकशा आंदोलनाच्या काळातच का सुरू झाल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या चौकशांमुळे आपण किंवा आपले सहकारी मागे हटणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“कितीही चौकशा करा, मला काही फरक पडत नाही. माझ्या सहकाऱ्यांना चौकशांना सामोरे जावे लागू शकते, याची कल्पना मी आधीच दिली होती,” असे जरांगे म्हणाले.
भाषेबाबतच्या आरोपांनाही प्रत्युत्तर
आपण शिवराळ भाषा वापरत असल्याच्या आरोपांनाही जरांगे पाटील यांनी उत्तर दिले. सरकार आपल्या मागण्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाषेचा मुद्दा पुढे करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“लोकांच्या मागण्या टाळण्यासाठी आणि स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी भाषेचा मुद्दा पुढे केला जात आहे. समाजाला वारंवार त्रास दिला जाणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही,” असे त्यांनी म्हटले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रस्तावित ‘मुंबई चलो’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता सरकारची पुढील भूमिका आणि पोलिस प्रशासन काय निर्णय घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

