नवी दिल्ली/पुणे
१८व्या BRICS शिखर परिषदेच्या निमित्ताने व्हिएतनामचे पंतप्रधान श्री ले मिन्ह हंग यांचे आज नवी दिल्ली येथे आगमन झाले. त्यांच्या भारत आगमनावेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भारत सरकारच्या वतीने त्यांचे स्वागत केले.
व्हिएतनामच्या पंतप्रधानांचे भारत सरकारच्या वतीने स्वागत करण्याची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पार पाडली. यावेळी त्यांनी श्री. ले मिन्ह हंग यांचे भारतात मनःपूर्वक स्वागत करत, भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील दृढ व दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंधांना अधोरेखित केले.
भारत आणि व्हिएतनाम यांच्यात ऐतिहासिक आणि मैत्रीपूर्ण संबंध असून, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, संस्कृती यांसह विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांचे सहकार्य सातत्याने वृद्धिंगत होत आहे. व्हिएतनामच्या पंतप्रधानांचा हा भारत दौरा दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना आणखी बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या १८व्या BRICS शिखर परिषदेच्या माध्यमातून सदस्य व सहभागी देशांमध्ये विविध जागतिक आणि प्रादेशिक विषयांवर विचारविनिमय तसेच सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. या व्यासपीठामुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सहकार्य अधिक व्यापक आणि परिणामकारक करण्यासाठीही महत्त्वपूर्ण संवादाला चालना मिळणार आहे.

