संतोष पंडितांची अटक चुकीची असल्याचा आरोप; गुन्हा मागे घेण्याची मागणी, अन्यथा सामाजिक संघटना सरकारला जाब विचारतील
पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडणारे आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारे रीलस्टार संतोष पंडित यांना पुणे पोलिसांनी पहाटे अटक केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी महापौर प्रशांत जगताप यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत, संतोष पंडित यांच्यावरील गुन्हा आणि अटकेची कारवाई चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
संतोष पंडित हे समाजमाध्यमांवर पुणेकरांच्या समस्या, नागरिकांना अडचणीच्या ठरणाऱ्या बाबी तसेच सरकारच्या कारभारातील त्रुटींवर सातत्याने व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य करत आले आहेत. राजकीय पुढाऱ्यांना आणि विशेषतः सत्तेतील लोकप्रतिनिधींना ते प्रश्न विचारतात. हाच आवाज सरकारला खटकत असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला.
केंद्रातील नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकार तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभारावरही जगताप यांनी जोरदार टीका केली. देशात आणि राज्यात दादागिरी व हुकूमशाहीचे स्वरूप वाढत असल्याचा आरोप करत, एखादा सामाजिक कार्यकर्ता नागरिकांचे प्रश्न मांडत असेल आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारत असेल तर त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होणे गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले.
संतोष पंडित यांनी ज्यांना प्रश्न विचारले, त्यांच्याशी थेट संबंध नसलेल्या व्यक्तींना पुढे करून तक्रारी दाखल करवून घेतल्या जात असल्याचा आरोपही जगताप यांनी केला. अशा पद्धतीने संतोष पंडित यांच्यासारख्या व्यक्तींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा दावा प्रशांत जगताप यांनी आपल्या प्रतिक्रियेत केला असून, त्याबाबत पोलिसांची स्वतंत्र भूमिका आहे.
यावेळी प्रशांत जगताप यांनी सरकारला थेट इशाराही दिला.
“तुम्ही जेवढा आवाज दाबाल, तेवढाच हा संतोष उफाळून येईल,” असे सांगत त्यांनी या कारवाईवरून सरकारवर निशाणा साधला. इतिहासात जनतेचा आवाज दाबण्याचे प्रयत्न झाले तेव्हा त्याविरोधात अधिक तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचे सांगत त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीचाही उल्लेख केला.
संतोष पंडित यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावा आणि त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई थांबवावी, अशी मागणी जगताप यांनी सरकारकडे केली आहे.
अन्यथा या प्रकरणात न्यायालयीन लढाई तर होईलच, पण विविध सामाजिक संघटनाही पुढे येऊन सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
संतोष पंडित यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांकडूनही सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत असून, आता प्रशांत जगताप यांनी थेट सरकारवर निशाणा साधल्याने पंडित यांच्या अटकेचा मुद्दा राजकीय वर्तुळातही तापण्याची चिन्हे आहे

