चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप; कोथरूड पोलिसांची कारवाई, अटकेच्या ‘टायमिंग’ची पुण्यात चर्चा
पुणे : पुण्यातील नागरी समस्या, रस्ते आणि विकासकामांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवणारे युट्यूबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. विशेष म्हणजे, या कारवाईच्या आदल्या दिवशीच पंडित यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनाच्या नंबर प्लेटवरून प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणाचा व्हिडिओ तसेच कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चर्चेत असतानाच काही तासांत पंडित यांच्यावर झालेल्या पोलिस कारवाईमुळे पुण्यात राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, पडळकरांना जाब विचारल्यामुळेच पंडित यांना अटक करण्यात आली, असे काहीही पोलिसांकडून सांगण्यात आलेले नाही.
संतोष पंडित यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर एचएसआरपी नंबर प्लेट नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत जाब विचारल्यानंतर पंडित यांना पडळकर समर्थकांकडून शिवीगाळ आणि धमक्या मिळाल्याचा दावा करण्यात आला असून, यासंदर्भातील कथित ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे पंडित यांच्या अटकेच्या काही तास आधी घडलेल्या या प्रकरणाकडेही आता लक्ष वेधले जात आहे.
दरम्यान, पंडित यांच्या अटकेमागील पोलिस प्रकरण मात्र वेगळे आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी नगरसेविका मिताली साळवेकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह, बदनामीकारक तसेच अश्लील स्वरूपाचा मजकूर आणि व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप संतोष पंडित यांच्यावर करण्यात आला आहे. सारिका कांबळे यांनी याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार ‘संतोष पंडित 6278’ या यूट्यूब अकाउंटवरून संबंधित व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0361/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 75(1)(iv), 75(3), 356(2), 352 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 67 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 3 सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे 1.28 वाजता गुन्ह्याची नोंद झाल्याचे वृत्त असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल शिवाजी माने यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
यानंतर पहाटे सुमारे एकच्या सुमारास पोलिसांचे पथक संतोष पंडित यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना घरातून पोलिसांसोबत नेत असतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
या प्रकरणाला आणखी एक पार्श्वभूमी आहे. चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि शिवराळ मजकूर असलेला व्हिडिओ प्रसारित केल्याच्या आरोपावरून यापूर्वीच डेक्कन पोलीस ठाण्यात संतोष पंडित यांच्यासह अन्य एकाविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजपचे माजी नगरसेवक सुनील पांडे यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. ‘राजकारण एक्सप्रेस’ या सोशल मीडिया अकाउंटवरून संबंधित व्हिडिओ प्रसारित झाल्याचा आरोप त्या फिर्यादीत करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम 356, 296 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संतोष पंडित हे पुण्यातील रस्ते, खड्डे, निकृष्ट दर्जाची विकासकामे तसेच नागरी समस्यांवर आपल्या खास शैलीत व्हिडिओ करून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्यासाठी परिचित आहेत. त्यामुळे त्यांच्या मध्यरात्री झालेल्या अटकेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत.
एका बाजूला चंद्रकांत पाटील आणि मिताली साळवेकर यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्याचे स्पष्ट होत आहे; तर दुसऱ्या बाजूला अटकेच्या अवघ्या काही तास आधी पंडित यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनाच्या नंबर प्लेटचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे अटकेच्या वेळेबाबत प्रश्न आणि चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या दोन्ही घटनांचा थेट संबंध असल्याचा अधिकृत पुरावा किंवा पोलिसांचा दावा अद्याप समोर आलेला नाही.
त्यामुळे सध्या स्पष्ट बाब एवढीच—संतोष पंडित यांच्यावरील अटकेची पोलिस नोंद चंद्रकांत पाटील आणि मिताली साळवेकर यांच्याबाबतच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणाशी संबंधित आहे; तर पडळकर प्रकरण हे अटकेच्या काही तास आधी घडलेले आणि त्यामुळे चर्चेत आलेले स्वतंत्र प्रकरण आहे असे सांगण्यात येते आहे .

