द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त २०१ व्याख्यानांच्या उपक्रमाचा शुभारंभ; एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत फुले यांचे विचार पोहोचविण्याचा संकल्प
मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता, स्त्री सक्षमीकरण, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हक्क आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या जन्माला दोनशे वर्षे होत असली, तरी समाजातील विषमता पूर्णपणे संपलेली नाही. त्यामुळे महात्मा फुले यांचे कार्य आणि त्यांच्या विचारांची लढाई अद्याप अपूर्ण असून, ती पुढे नेण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त शिक्षक महासंघ, मुंबई व कोकण विभागातर्फे आयोजित २०१ शाळा व महाविद्यालयांमधील २०१ व्याख्याने आणि शिक्षकांशी संवाद या विशेष उपक्रमाचा शुभारंभ डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते चर्चगेट येथील ब्लॉसम इंग्लिश स्कूलमध्ये झाला. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १० हजार शिक्षकांच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत महात्मा फुले यांचे विचार पोहोचविण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत व लेखक किरण सोनवणे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “आजही अनेक शाळांमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता यांसारखे प्रश्न आहेत. या समस्यांवर लक्ष देतानाच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता, समानता आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती निर्माण करणे आवश्यक आहे. शाळेतील शिक्षण केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता सामाजिक जाणिवा घडविणारे असले पाहिजे.”
महात्मा फुले यांच्या काळात सर्वच मुलांना, विशेषतः मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मुलींना शिकवल्यास त्या बिघडतील आणि संस्कृती धोक्यात येईल, अशा गैरसमजांमुळे त्यांच्या शिक्षणाला विरोध केला जात होता. या अन्यायकारक व्यवस्थेला महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी धैर्याने आव्हान दिले. विरोध, अपमान आणि बहिष्कार सहन करून त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या आणि शिक्षणाची दारे खुली केली, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
बालविवाह, विधवांचे केशवपन, महिलांवरील अत्याचार, बालहत्या आणि संकटग्रस्त महिलांची असुरक्षितता यांसारख्या अमानवी प्रथांविरुद्ध फुले दाम्पत्याने संघर्ष केला. बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करून त्यांनी संकटात सापडलेल्या महिलांना आश्रय दिला. एका बालकाला दत्तक घेऊन त्याचे संगोपन करण्याच्या कृतीतून त्यांनी आपले विचार प्रत्यक्ष आचरणात आणले. स्त्रीला सन्मानाने जगण्याचा आणि शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, हा विचार त्यांनी समाजात रुजविला, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
सामाजिक समतेचा अर्थ स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, “एखादा विद्यार्थी मोटारीतून शाळेत येतो आणि दुसरा बस किंवा रेल्वेने येतो म्हणून त्यांच्यात भेदभाव होता कामा नये. जात, धर्म, आर्थिक परिस्थिती किंवा पोशाख यावरून कोणीही मोठे किंवा लहान ठरत नाही. प्रत्येकाला समान प्रतिष्ठा, संधी आणि अधिकार मिळणे, हाच महात्मा फुले यांच्या विचारांचा गाभा आहे.”
महात्मा फुले यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या दुःखालाही वाचा फोडली. शेतमाल निर्माण करण्यासाठी परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही, हे त्यांनी तत्कालीन व्यवस्थेसमोर निर्भीडपणे मांडले. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाची चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविली. आजच्या विद्यार्थ्यांनी अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तू निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या श्रमांविषयीही संवेदनशील असले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करून डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, शाळांमध्ये मुला-मुलींना ‘गुड टच-बॅड टच’, वैयक्तिक सुरक्षितता आणि तक्रार करण्याचे योग्य मार्ग यांची माहिती दिली पाहिजे. एखाद्या मुलीबाबत गैरप्रकार घडल्यास तिलाच दोष देण्याऐवजी कुटुंब, शिक्षक आणि समाजाने तिच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. शाळेतील स्वच्छतागृहे आणि परिसराची सुरक्षितता, विद्यार्थ्यांच्या हालचालींवर संवेदनशील देखरेख तसेच विश्वासाने तक्रार करता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.
सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापराबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना सावध केले. “सोशल मीडिया हा महामार्गासारखा आहे. त्याचा उपयोग करताना आवश्यक ती खबरदारी घेतली नाही, तर फसवणूक, छळ आणि ब्लॅकमेलिंगचा धोका निर्माण होऊ शकतो. वैयक्तिक माहिती किंवा छायाचित्रे कोणाशी आणि किती प्रमाणात शेअर करावीत, याचे भान विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. काही ऑनलाइन गेम्स आणि डिजिटल माध्यमांतून मुलांना अनुचित कृतींसाठी प्रवृत्त केले जाते. अशा धोक्यांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यात शिक्षक आणि पालकांची महत्त्वाची भूमिका आहे,” असे त्यांनी सांगितले.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळेच आज मुला-मुलींना एकत्र शिक्षण घेता येते आणि आपले विचार निर्भीडपणे मांडता येतात. विद्यार्थ्यांनी फुले दाम्पत्याचे चरित्र वाचावे, त्यांच्या कार्यावर शाळांमध्ये चर्चा करावी आणि समता, बंधुता, शिक्षण, न्याय व परस्पर सन्मान ही मूल्ये आपल्या जीवनात उतरवावीत, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
या उपक्रमाची मूळ संकल्पना कार्यकर्ते, विचारवंत व लेखक किरण सोनवणे यांनी मांडली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे या उपक्रमाला सुरुवातीपासून मार्गदर्शन लाभले आहे. किरण सोनवणे आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यात झालेल्या चर्चेतून या संकल्पनेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई व कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

