मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन
मुंबई : महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसंदर्भात ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिष्टमंडळाने मांडलेले सर्व मुद्दे मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांभीर्याने ऐकून घेतले. ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित प्रश्नांमध्ये वैयक्तिक लक्ष घालून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
राज्य सरकारने ब्राह्मण समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी ‘अमृत महामंडळ’ तसेच ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन केले आहे. मात्र, या महामंडळांच्या माध्यमातून समाजातील लाभार्थ्यांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याची भूमिका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.
महामंडळांच्या योजना प्रत्यक्ष आणि प्रभावीपणे राबविण्याची गरज असून, त्या केवळ कागदोपत्री मर्यादित राहू नयेत, अशी मागणी करण्यात आली. योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील अडचणी आणि कथित राजकीय हस्तक्षेपाबाबतही मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली. समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची भेट
मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली. समाजाच्या मागण्या मार्गी लागाव्यात, यासाठी यापूर्वी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यात आले होते.
या शिष्टमंडळात अखिल भारतीय पेशवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे पाटील, परशुराम हिंदू सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विश्वजीत देशपांडे आणि अखिल भारतीय सकल ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी (सुपेकर) यांचा समावेश होता.

