चार ठिकाणी छिद्रे पाडण्यात यश; ३६१ जणांची सुटका, मृतांचा आकडा ७५२ वर; २,५०२ जण अद्याप बेपत्ता
काठमांडू : नेपाळमधील भीषण पूर आणि भूस्खलनानंतर जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य अधिक तीव्र करण्यात आले आहे. उपलब्ध ताज्या माहितीनुसार विविध बोगद्यांमध्ये सुमारे ८९८ कर्मचारी अडकले असून आतापर्यंत ३६१ जणांची सुटका करण्यात आली आहे.
त्रिशुली-३ ‘ए’ जलविद्युत प्रकल्पातील बचाव मोहिमेत काही प्रमाणात यश आले आहे. बोगद्याच्या पुढील भागात चार छिद्रे पाडण्यात आली आहेत. सहा इंच व्यासाच्या एका छिद्रातून पाईपद्वारे बोगद्यात हवा सोडण्यात येत आहे. आता हे छिद्र मोठे करून ‘मॅनहोल’ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर बचाव पथकांना प्रत्यक्ष बोगद्यात प्रवेश करून अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेता येणार आहे.
दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार नेपाळमधील मृतांची संख्या ७५२ झाली असून २,५०२ जण अद्याप बेपत्ता आहेत. २३९ जण जखमी झाले आहेत, तर ८,७३० जणांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे.
भारताकडूनही नेपाळला मदत सुरू आहे. मानवतावादी मदत साहित्याबरोबरच ११ सदस्यांचे वैद्यकीय आणि विशेष टनेल-रेस्क्यू पथक नेपाळमध्ये दाखल झाले आहे.
दुसरीकडे नेपाळ-तिबेट सीमेजवळ हिमनदी आणि खडक कोसळल्यामुळे तयार झालेल्या धोकादायक सरोवरातील बहुतांश पाणी नैसर्गिक मार्गाने वाहून गेले आहे. त्यामुळे पुन्हा अचानक मोठा पूर येण्याचा तातडीचा धोका कमी झाला आहे. या सरोवरात सुमारे २० लाख घनमीटर पाणी साचले होते.

