जालन्यात युनिसेफच्या ‘कुटुंब आणि समुदायआधारित काळजी व संरक्षण’ कार्यक्रमाला भेट; मुलांशी साधला संवाद
जालना : आर्थिक अडचणींमुळे होणारे हंगामी स्थलांतर अनेक कुटुंबांसाठी कठोर वास्तव आहे. मात्र, आपल्या आवाक्याबाहेरील परिस्थितीमुळे कोणत्याही मुलाला त्याचे बालपण गमवावे लागू नये, असे मत प्रसिद्ध अभिनेते आणि युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत आयुष्मान खुराना यांनी व्यक्त केले.
खुराना यांनी जालना येथे हंगामी स्थलांतराचा परिणाम झालेल्या मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या युनिसेफच्या ‘कुटुंब आणि समुदायआधारित काळजी व संरक्षण’ या कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुले, किशोरवयीन मुली, कुटुंबीय आणि स्थानिक समुदायातील सदस्यांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत युनिसेफ इंडियाचे उपप्रतिनिधी (कार्यक्रम) यास्पर मोलर उपस्थित होते. या उपक्रमाला राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य आहे.
आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना रोजगारासाठी हंगामी स्थलांतर करावे लागते. त्याचा थेट परिणाम मुलांच्या आयुष्यावर होतो. बालमजुरी, बालविवाह, शिक्षणात खंड, कौटुंबिक दुर्लक्ष आणि हिंसाचाराचा धोका अशा मुलांसमोर निर्माण होऊ शकतो. पालक स्थलांतरित झाल्यानंतर आजी-आजोबा किंवा नातेवाईकांकडे राहणाऱ्या मुलांना शिक्षण आणि आरोग्यसेवा मिळत असली, तरी भावनिक आधाराचा अभाव आणि घरगुती जबाबदाऱ्यांचे ओझे त्यांच्यावर पडण्याची शक्यता असल्याचे युनिसेफने म्हटले आहे.
जालन्यात जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमातून अशा मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याबरोबरच त्यांचे शिक्षण सुरू ठेवणे, आरोग्यसेवा, पोषण आणि मानसिक-सामाजिक आधार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. बालमजुरी आणि बालविवाहाचा धोका कमी करण्यासाठीही या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
“हंगामी आणि आर्थिक अडचणींमुळे होणारे स्थलांतर हा स्वखुशीने निवडलेला पर्याय नसून अनेक कुटुंबांसाठी कठोर वास्तव आहे. कोणत्याही मुलाला त्याच्या आवाक्यात नसलेल्या परिस्थितीमुळे आपले बालपण गमवावे लागू नये,” असे खुराना यांनी सांगितले.
जालन्यात स्थानिक समुदाय स्थलांतरामुळे प्रभावित झालेल्या मुलांच्या संरक्षणासाठी एकत्र येत असल्याचे पाहायला मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम केवळ सुरक्षित घर उपलब्ध करून देत नाही, तर मुलांचे नातेसंबंध जपतो, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतो आणि उज्ज्वल भविष्याची आशा देतो, असे खुराना म्हणाले.
यावेळी खुराना यांनी युवा स्वयंसेवक म्हणून काम करून स्थानिकांचा विश्वास संपादन केल्यानंतर गावाचे सरपंच म्हणून निवडून आलेल्या शंकर आसाराम यांची भेट घेतली. बारावीत शिकणारी विद्यार्थिनी आणि ‘बालमित्र’ म्हणून काम करणाऱ्या प्रतिक्षा हिच्याशीही त्यांनी संवाद साधला.
स्थलांतराचा अनुभव घेतलेल्या १८ वर्षीय शिल्पा हिचीही खुराना यांनी भेट घेतली. शिल्पाने शालेय शिक्षण पूर्ण करून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून हंगामी स्थलांतराचे पिढ्यानपिढ्या सुरू असलेले चक्र मोडण्याची संधी मुलींना मिळू शकते, असे खुराना यांनी यावेळी नमूद केले.
पालक स्थलांतरित झाल्यानंतर आजोबा दोन नातवंडांची काळजी घेत असलेल्या एका कुटुंबालाही त्यांनी भेट दिली. बालमित्र आणि स्थानिक समुदायाच्या मदतीमुळे ही मुले शाळेत जात असून त्यांना पोषण, लसीकरण आणि आरोग्यविषयक सेवाही मिळत असल्याचे सांगण्यात आले.
“प्रत्येक मुलाला सुरक्षित, प्रेमळ आणि पोषक कौटुंबिक वातावरणात वाढण्याचा हक्क आहे,” असे खुराना म्हणाले. सरकार, युनिसेफ, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक नागरिक एकत्र येऊन प्रत्येक मूल सुरक्षित राहील यासाठी काम करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
युनिसेफने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ पासून जालन्यातील २५८ पथदर्शी गावांमध्ये पालकांच्या स्थलांतरानंतर कुटुंब-आधारित पर्यायी व्यवस्थेत राहणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढून ६०.२३ टक्क्यांवर पोहोचले आहे. २०२६ मध्ये जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये ६४९ युवा स्वयंसेवक कार्यरत असून हा कार्यक्रम आणखी १९८ गावांमध्ये विस्तारित करण्यात आला आहे.
२०२४-२५ मध्ये पालक हंगामी रोजगारासाठी स्थलांतरित झाल्यानंतर ५,८०० हून अधिक मुले आजी-आजोबा किंवा नातेवाईकांकडे राहिली. या उपक्रमांमुळे शालेय अनुपस्थिती आणि गळती कमी करणे, पोषण व आरोग्यसेवा अखंड सुरू ठेवणे तसेच बालमजुरी, बालविवाह आणि किशोरवयीन गर्भधारणा रोखण्यास मदत झाल्याचे युनिसेफने नमूद केले आहे.
युनिसेफ इंडियाचे यास्पर मोलर यांनी मुलांच्या आयुष्यातील संभाव्य धोके वेळेत ओळखून कुटुंबांना आवश्यक सेवा देणे आणि मुलांना सामाजिक संरक्षणाशी जोडणारी व्यवस्था अधिक मजबूत करण्याची आवश्यकता व्यक्त केली. खुराना आणि मोलर यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेऊन या कार्यक्रमामुळे मुले आणि कुटुंबांवर होत असलेल्या परिणामाबाबत चर्चा केली.

