पुणे : उच्च प्रगल्भता, भावपूर्णता लाभलेली बनारसी घराण्याची गायकी आणि सुमधुर सादरीकरणातून रसिकांनी स्वरवर्षावाची अनुभूती घेतली. निमित्त होते श्रीराम पुजारी प्रतिष्ठान आयोजित श्रीराम पुजारी जन्मशताब्दी सांगता समारोहाचे.
सोलापूर येथील सांस्कृतिक राजदूत म्हणून ओळख असणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक व समाजधुरीण प्रा. श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दी सांगता समारोहाचे आयोजन कोथरूडमधील पुण्याई सभागृहात करण्यात आले आहे. दोन दिवसीय समारोहाच्या पहिल्या दिवसाची (शनिवार) सुरुवात पंडित राम मराठे यांची नात प्राजक्ता मराठे यांच्या गायनाने झाली. त्यांनी ‘ओ मान केरो’ ही राग पूर्वामधील बंदिर करून त्याला जोडून द्रुत तालात पंडित राम मराठे यांची ‘चंचल चतुरा सुघर नारी’ ही बंदिश प्रभावीपणे ऐकविली. त्यानंतर पंडित मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी रचलेली आणि स्वरबद्ध केलेली शिवकल्याण रागातील ‘माई री प्रितम करो दुल्हन पे’ ही बंदिश ताकदीने सादर करून रसिकांना मोहित केले. ‘ओ श्याम बजाए मोरे घरमे मुरलीया’ या रचनेने प्राजक्ता मराठे यांनी आपल्या मैफलीची सांगता केली. सुमधुर आवाज, दमदार ताना, सुरांवरील पकड याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. मराठे यांना यती भागवत (तबला), सिद्धेश बिचोलकर (संवादिनी), वर्षा लाटे, माणिक पुरोहित (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
पहिल्या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध गायक दिवाकर व प्रभाकर कश्यप यांची गायन मैफल रंगली. त्यांनी राग मियाँ मल्हारमधील ‘करीम तेरो नाम, तू साहिब सततार’ ही पारंपरिक बंदिश पेश केली. त्यानंतर ‘कारे कजरारे बदरारे’, ‘बरसन लागी बदरिया रितु सावन की’ या बंदिशी ऐकविल्या. बनारस घराण्याचा अंदाज दर्शविणारी अवघड गायकी ‘टप्पा’ सादर करताना त्यातील तीव्र स्वर, घुमावदार ताना, गायनाचे तेज व गती दर्शवून रसिकांना स्तिमीत केले. मैफलीची सांगता ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया’ या भैरवीने करताना गुरू राजन व साजन मिश्रा यांनी अजरामर केलेली ही कलाकृती ताकदीने साकारली. भावप्रधान स्वरांमधून रसाळपणा जपत प्रगल्भता लाभलेले सुसंवादी युगल गायन रसिकांसाठी पर्वणी ठरले. कश्यप बंधूंना आशय कुलकर्णी (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), ऋषिकेश पवार, वरद दलाल (तानपुरा) यांनी समर्पक साथसंगत केली.
विदुषी कलापिनी कोमकली, रघुवीर जोशी, सतिश जोशी, शुभदा जोशी, ललिता दातार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंजुषा गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.

