मुंबई-बंगळुरू महामार्गालगत सुतारवाडी येथे छापा; ६१ हजार २२० रुपयांची दारू जप्त
पुणे, दि. २२ ऑगस्ट : बाणेर पोलिसांनी मुंबई-बंगळुरू महामार्गालगत सुतारवाडी-पाषाण परिसरातील ‘सुर्वेज हॉटेल ’ येथे कारवाई करत बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवलेला दारू आणि बिअरच्या बाटल्यांचा साठा जप्त केला. या कारवाईत ६१ हजार २२० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली असून हॉटेल मॅनेजरसह हॉटेल मालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त आणि अवैध धंद्यांविरोधातील कारवाईच्या अनुषंगाने पोलीस पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी सानप यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत सुतारवाडी, पाषाण येथील मुंबई-बंगळुरू हायवे सर्व्हिस रोडलगत असलेल्या सुर्वेज हॉटेलात बेकायदेशीरपणे दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली.
सानप यांनी ही माहिती बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना दिली. माहितीची खातरजमा केल्यानंतर सावंत यांनी संबंधित ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी सानप आणि पोलीस पथक सुवेज ढाब्याकडे रवाना झाले.
हॉटेलमध्ये दारू-बिअरच्या बाटल्यांचा साठा
पोलिसांच्या पथकाने हॉटेलच्या मागील बाजूस जाऊन पाहणी केली असता हॉटेलमध्ये दारू आणि बिअरच्या बाटल्यांचा साठा ठेवण्यात आल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या हॉटेल मॅनेजरला ताब्यात घेत त्याची चौकशी केली.
चौकशीत मॅनेजरने आपले नाव गोपाल श्रीकृष्ण निचळ (वय ४५), रा. फ्लॅट नं. ६०१, रुद्र सोसायटी, साँगबर्ड सोसायटी शेजारी, पौड रोड, भुगाव, पुणे असे सांगितल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ६१ हजार २२० रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली. त्यानंतर हॉटेल मॅनेजरबरोबरच हॉटेलचा मालक कुणाल सुधाकर गायकवाड (वय ३९), रा. फ्लॅट नं. १०१, सिल्व्हर क्राऊन अपार्टमेंट, कृष्णा चौक, पिंपळे गुरव, पुणे यालाही अटक करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-४, सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खिल्लारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी सानप, पोलीस अंमलदार सौरभ पाटील आणि गणेश मुंढे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

