पुणे : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानात झालेली घट आणि पुढील वर्षापर्यंत त्याचा परिणाम कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे महापालिकेने पाणी वापरावर मोठे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 ऑक्टोबर 2026 पासून दर गुरुवारी पुणे शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. उपलब्ध पाणीसाठा 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पुरविण्याच्या दृष्टीने काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
राज्य सरकारने 5 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना 16 ऑक्टोबरपासून पाणी वापरात किमान 10 टक्के कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उपलब्ध पाणीसाठा आणि पुढील काळातील परिस्थिती पाहून ही कपात आणखी वाढवण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑक्टोबर रोजी खडकवासला धरणसाखळीत सुमारे 26.12 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा दरवर्षीच्या तुलनेत कमी असल्याने पुणे शहरासाठी उपलब्ध पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दर गुरुवारी पुणेकरांचा ‘ड्राय डे’
पुणे महापालिका हद्दीत 15 ऑक्टोबरपासून प्रत्येक गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या उपाययोजनेतून पाण्याची बचत करून उपलब्ध साठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरविण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
त्यासोबतच नागरिक, व्यावसायिक संस्था, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल्स, सोसायट्या आणि इतर आस्थापनांसाठी पाणी वापराबाबत कठोर सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई
कोणत्याही बांधकामासाठी महापालिकेचे पिण्याचे पाणी वापरता येणार नाही. बांधकामासाठी STP प्रक्रिया केलेले पाणी, बोअरवेल किंवा विहिरीचे पाणी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
घरगुती नळ, सार्वजनिक नळ, फ्लश टँक किंवा पाइपलाइनमधून गळती होत असल्यास ती तातडीने दुरुस्त करावी. गृहनिर्माण सोसायट्यांमधील टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत याची खबरदारी घेण्याचेही आदेश आहेत.
वाहन धुणे, अंगण-पदपथ स्वच्छ करण्यासाठी पिण्याचे पाणी नको
सार्वजनिक आणि खासगी वॉशिंग सेंटरमध्ये पाण्याच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. वाहने धुणे, अंगण किंवा पदपथ स्वच्छ करण्यासाठी महापालिकेचे पिण्याचे पाणी वापरू नये.
खासगी तसेच सार्वजनिक स्विमिंग पूल आणि मनोरंजनासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर बंद करण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत.
सोसायट्यांना STP सुरू ठेवणे बंधनकारक
ज्या गृहनिर्माण सोसायट्यांना STP प्रकल्प बंधनकारक करण्यात आला आहे, त्या सोसायट्यांनी STP पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवावा. त्यातून प्रक्रिया झालेले पाणी गार्डनिंग आणि फ्लशिंगसाठी पुनर्वापर करणे आवश्यक राहणार आहे.
घरातून निर्माण होणारे तुलनेने स्वच्छ Grey Water बागकाम किंवा स्वच्छतेसाठी पुनर्वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असेही महापालिकेने म्हटले आहे.
हॉटेल-रेस्टॉरंटनाही पाणी बचतीचे आदेश
सार्वजनिक हॉटेल्स, रेस्टॉरंट, खानावळी, कँटीन आणि हॉटेल व्यवस्थापनांनी पिण्याच्या पाण्याची बचत करणाऱ्या पद्धतींचा वापर करावा. टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि आवश्यक असल्यास ऑटोमॅटिक फ्लोट व्हॉल्व्ह बसवावेत.
अंगण, भांडी आणि कपडे धुण्यासाठीही केवळ आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करून अपव्यय टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अनधिकृत नळजोडांवर कारवाई; गुन्हेही दाखल होणार
अनधिकृत नळजोड आढळल्यास संबंधित जोडणीवर कारवाई केली जाईल. आवश्यकता भासल्यास संबंधित नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे.
गृहनिर्माण संस्था आणि व्यापारी आस्थापनांनी पाणी बचतीसाठी स्वतंत्र उपाययोजना आखून महापालिकेला सहकार्य करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
गळती किंवा पाण्याचा अपव्यय दिसला तर येथे कळवा
शहरात पाण्याची गळती, फुटलेली जलवाहिनी किंवा पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी महापालिकेला तातडीने माहिती द्यावी.
PMC Call Center / PMC Care : 1800-1030-222
WhatsApp : 9689900002
तसेच PMC Care App वरही तक्रार करता येणार आहे.

