पुणे-काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील विद्यार्थिनीवर दबाव टाकून माफी मागण्यास लावल्याबद्दल आणि तिला कोंडून ठेवल्याबद्दल भाजपवर टीका केली आहे. विद्यार्थिनींनी प्रसारमाध्यमांसमोर आपल्या अडचणी मांडल्यानंतर सुधारणा करण्याऐवजी हा प्रकार घडल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवार यांनी विद्यार्थिनीला अभाविप आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्रास झाल्याचा आरोप करत तिची माफी मागितली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली नसतानाही युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पोलिसांनी चुकीचे गुन्हे दाखल केल्याचा दावा त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की सर्व दिवस सारखे नसतात, असेही ते म्हणाले.
पोलिसांनी बळाचा वापर करून काँग्रेस कार्यकर्त्यांवर दडपशाहीने गुन्हे दाखल केले, मात्र सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोकाट सोडले जात आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. भाजपकडून खोट्या गोष्टी पसरवल्या जात असून, राहुल गांधी यांच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना पैसे देऊन आणले जात असल्याचा आरोपही भाजप करत असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच त्यांना राहुल गांधी यांच्या सभेची धास्ती वाटत असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला.
माजी मंत्री विश्वजित कदम यांनी राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. पुणे हे ऐतिहासिक शहर असून येथे देशभरातून तसेच परदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यात सुरू केली, तसेच पहिले विद्यापीठही पुण्यात सुरू झाले, असे कदम यांनी सांगितले.
विद्यार्थिनींच्या प्रश्नांना व्यासपीठ देण्यासाठी राहुल गांधी हा कार्यक्रम पुण्यात घेत आहेत. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली असून विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राहुल गांधी यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठोस आणि आक्रमक भूमिका घेतली आहे, असे कदम म्हणाले. विद्यार्थी प्रामाणिकपणे परीक्षेची तयारी करतात, मात्र पेपरफुटीसारख्या घटनांमुळे त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सीओईपीमधील काही विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळत नसल्याची तक्रार केली होती, त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने त्यांना वसतिगृहात कोंडून ठेवल्याचा आरोप केला. त्यामुळे युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तेथे गेले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमासाठी आतापर्यंत ४३ हजार जणांनी नोंदणी केली आहे. कार्यक्रमाच्या मैदानाची क्षमता १५ ते १८ हजारांची असताना त्यापेक्षा अधिक नोंदणी झाली आहे. त्यामुळे पैसे देऊन विद्यार्थ्यांना सभेसाठी आणण्याची गरजच काय, असा सवाल जगताप यांनी केला. भाजपकडून करण्यात येणारे आरोप दिशाभूल करणारे आणि खोटे असल्याचा दावाही त्यांनी केला.

