आमदार शरद सोनवणे यांच्या प्रयत्नांचा उल्लेख; ग्रामीण भागात ‘कम्युनिटी पोलिसिंग’ मजबूत करून ‘पिंपळवंडी पॅटर्न’ विकसित करण्याची गरज
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व मृत्यूच्या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पीडित कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या भावना, अपेक्षा आणि सुरक्षेसंदर्भातील मागण्या त्यांनी जाणून घेतल्या.
डॉ. गोऱ्हे पीडित कुटुंबाशी संवाद साधत असतानाच उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून पीडित कुटुंबाशी थेट संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. पीडित कुटुंब एकटे नसून शासन त्यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल तसेच या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतली. पोलिसांकडून तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगत त्यांनी वैद्यकीय, फॉरेन्सिक, तांत्रिक व अन्य पुरावे भक्कमपणे संकलित करून न्यायालयासमोर मांडण्याची आवश्यकता व्यक्त केली.
“नसरापूर प्रकरणात ज्याप्रमाणे सक्षम तपास, भक्कम पुरावे आणि प्रभावी न्यायालयीन पाठपुराव्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा झाली, त्याच धर्तीवर जुन्नर प्रकरणातील आरोपीलाही कठोरातील कठोर शिक्षा मिळावी. त्यासाठी शासन, पोलीस आणि सरकारी वकील यांच्या स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात यावा,” असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
पीडित कुटुंबाच्या मागण्यांकडे प्राधान्याने लक्ष
पीडित कुटुंबाने आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, गावातील अवैध मद्यविक्री व व्यसनाधीनतेवर नियंत्रण आणावे, मुला-मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे तसेच कोणत्याही प्रकारची भीती निर्माण होणार नाही असे सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशा प्रमुख अपेक्षा व्यक्त केल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. आदिवासी व दुर्गम वस्त्यांतील महिला व बालकांच्या सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अशा गंभीर घटना घडल्यानंतर केवळ तपास व कारवाई करून थांबणे पुरेसे नसून, अशा घटना घडूच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
पोलीस, ग्रामपंचायत, शाळा-महाविद्यालये, महिला व बालसुरक्षा यंत्रणा, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांच्या सहभागातून ‘कम्युनिटी पोलिसिंग’ मजबूत करण्याची आवश्यकता आहे. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पिंपळवंडी पोलीस ठाणे सक्षम करण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवरील सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा डॉ. गोऱ्हे यांनी विशेष उल्लेख केला.
ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन आणि स्थानिक समाज यांच्या सहभागातून ‘पिंपळवंडी पॅटर्न ऑफ पोलीस सिक्युरिटी’ विकसित करून प्रभावी प्रतिबंधात्मक मॉडेल म्हणून पुढे नेता येईल, असेही त्यांनी सांगितले.
केवळ मुलींना सावध करणे पुरेसे नाही
महिला आणि बालिकांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ मुलींवर टाकता येणार नाही. मुलगे व युवकांमध्ये महिलांचा सन्मान, संमतीचे महत्त्व, लैंगिक संवेदनशीलता, जबाबदार वर्तन आणि कायद्याची जाणीव याबाबत शाळा-महाविद्यालयांपासून गावपातळीपर्यंत सातत्याने प्रबोधन करण्याची गरज असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
चित्रपट, ऑनलाइन गेम्स व डिजिटल माध्यमांमधून दाखविण्यात येणाऱ्या हिंसक तसेच महिलांचा अवमान करणाऱ्या आशयाचा किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम गांभीर्याने विचारात घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन गेम्स व डिजिटल माध्यमांतील हिंसक प्रवृत्ती हे बालसुरक्षेसमोरील नवे आव्हान असून केंद्र व राज्य शासनाने त्याबाबत योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
पीडित कुटुंबाची ओळख, गोपनीयता आणि सुरक्षितता जपणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी माध्यमे व नागरिकांनीही संवेदनशीलता बाळगावी, असे आवाहन केले.
“पीडित कुटुंब एकटे नाही. शासन, पोलीस आणि समाज त्यांच्या पाठीशी आहे. या घटनेतून आवश्यक धडा घेऊन भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस यंत्रणा आणि समाजाचा सहभाग असलेली सक्षम प्रतिबंधात्मक व्यवस्था उभी करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
यावेळी आमदार शरद सोनवणे जिल्हाप्रमुख देवीदास दरेकर, जिल्हा परिषद सदस्य मंगेश अण्णा पाटील, सभापती कमलताई शेळकंडे, स्त्री आधार केंद्राच्या अनिता शिंदे, पिंपळवंडीच्या सरपंच मेघा काकडे, माजी पंचायत समिती सदस्य राजश्री गांजाडे, महिला जिल्हाप्रमुख कांताताई पांढरे, तालुकाप्रमुख बाबू पाटील, सहकार शिवसेना विभागाचे संदीप भाऊ लेंडे, आंबेगाव-जुन्नर जिल्हाप्रमुख सविता वाघ, मंचरच्या नगरसेविका अंशरा शेख, युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, आंबेगाव तालुकाप्रमुख प्रवीण थोरात पाटील, मंचरचे नगरसेवक लक्ष्मण मारुती पारधी, मंचरचे नगरसेवक तथा गटनेते विकास जाधव, तालुकाप्रमुख श्रद्धा सांडभोर, प्रसन्न डोके, विकास राऊत, जयसिंग भाऊ पोटे, जीवन शिंदे आणि श्याम भाऊ माळी आदी उपस्थित होते.

