‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला उपस्थित राहू नका, अशी विद्यार्थ्यांना धमकी दिल्याचा युवक काँग्रेसचा आरोप; विजय वडेट्टीवार घटनास्थळी
पुणे mymarathi.net : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येलाच शहरात राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यातील **COEP महाविद्यालय परिसरात काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन दोन्ही गट आमनेसामने आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राहुल गांधी विद्यार्थ्यांशी आणि युवकांशी संवाद साधणार आहेत. मात्र कार्यक्रमाच्या आधीच COEP परिसरातील या घटनेमुळे काँग्रेस आणि ABVP यांच्यातील संघर्ष उफाळून आला.
युवक काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, ABVPचे काही कार्यकर्ते COEP परिसरात आले होते. त्यांनी तेथील काही तरुणांना राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नका, अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
या आरोपाची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने परिसरात जमा झाले. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली.
या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हेही घटनास्थळी पोहोचले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ABVPच्या कथित भूमिकेविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
दरम्यान, परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी दोन्ही बाजूंना शांत करण्याचा तसेच संभाव्य संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याला यापूर्वीच प्रशासनाने विविध अटी आणि शर्ती घातल्याने राजकीय चर्चा सुरू होती. त्यात आता कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी COEP परिसरात काँग्रेस आणि ABVP कार्यकर्ते आमनेसामने आल्याने या कार्यक्रमाला आणखी राजकीय धार मिळाली आहे.
शनिवारी होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ केली जाण्याची शक्यता आहे

