ड्रोन शूटिंगला पूर्ण बंदी; ‘डी-झोन’मध्ये बॅरिकेडिंग, महिला सुरक्षा आणि प्रवेश व्यवस्थेबाबत आयोजकांना कडक सूचना
पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यात 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला अखेर पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी तब्बल 30 अटी आणि शर्तींसह देण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या सुरक्षेपासून गर्दी नियंत्रण, वाहतूक, अग्निसुरक्षा, ध्वनीप्रदूषण आणि महिला सुरक्षेपर्यंत विविध बाबींबाबत आयोजकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
राहुल गांधी यांचा हा कार्यक्रम पुण्यातील SSPMS मैदानावर होणार आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी ड्रोनद्वारे छायाचित्रण किंवा चित्रीकरण करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मुख्य व्यासपीठाचा परिसर अतिसुरक्षित ठेवण्यासह उपस्थित विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.
परवानगीवरून निर्माण झाला होता तणाव
कार्यक्रमाची तारीख जवळ आली तरी परवानगीचा मुद्दा चर्चेत होता. पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष दीप्ती चवधरी तसेच प्रशांत जगताप यांनी कार्यक्रम होणारच, अशी भूमिका घेतली होती. दरम्यान, काँग्रेस पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळी जाऊन सुरक्षा आणि तयारीचा आढावा घेतला. महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी कार्यक्रमासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्याचे सांगितले आहे.
याच काळात पुणे पोलिसांनी 18 ते 31 ऑगस्टदरम्यान शहरात महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या परवानगीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते.
ड्रोनबंदी ते ‘डी-झोन’ बॅरिकेडिंग
पोलिसांनी घातलेल्या प्रमुख अटींनुसार कार्यक्रमस्थळाच्या क्षमतेपेक्षा अधिक लोकांना प्रवेश देता येणार नाही. नागरिकांच्या येण्या-जाण्यासाठी किमान चार प्रवेशद्वारे ठेवावी लागतील. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, खासगी स्त्री-पुरुष सुरक्षारक्षक, जास्तीत जास्त महिला स्वयंसेवक, पुरेशी प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे आणि अग्निशमन साहित्याची व्यवस्था आयोजकांना करावी लागणार आहे.
व्यासपीठ आणि मंडप मान्यताप्राप्त व्यावसायिकाकडून उभारणे तसेच व्यासपीठ सुरक्षित असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ध्वनीप्रदूषण आणि पर्यावरणविषयक नियमांचे पालन करण्यासह वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करून वाहतुकीला अडथळा होणार नाही याचीही काळजी आयोजकांना घ्यावी लागणार आहे.
राहुल गांधी यांच्या मुख्य व्यासपीठासमोरील ‘डी-झोन’मध्ये संपूर्ण बॅरिकेडिंग करण्याची अट घालण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करता येणार नाही. तसेच पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासाठी आपत्कालीन मार्ग मोकळा ठेवण्याची जबाबदारी आयोजकांवर राहणार आहे. कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिसांना आवश्यक कारवाई करण्याचे अधिकार राहतील.
विद्यार्थिनींशी थेट संवाद साधणार राहुल गांधी
पुण्यातील ‘छात्रों की गूंज’चे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम विशेषतः विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी स्वतः पुण्यातील कार्यक्रम 22 ऑगस्टला होणार असून हा कार्यक्रम मुलींसाठी असल्याचे जाहीर केले आहे.
कार्यक्रमात राहुल गांधी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधणार आहेत. शिक्षण, परीक्षांमधील अनियमितता, पेपरफुटी, वाढती शैक्षणिक फी आणि तरुणांशी संबंधित प्रश्न या अभियानाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. ‘छात्रों की गूंज’च्या यापूर्वीच्या कार्यक्रमांतही विद्यार्थी आणि तरुणांच्या प्रश्नांवर संवाद साधण्यात आला आहे.
‘अब बेटियां बोलेंगी, देश सुनेगा’
पुण्यातील कार्यक्रम विद्यार्थिनींवर केंद्रित करत राहुल गांधी यांनी “अब बेटियां बोलेंगी, देश सुनेगा” अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे पुण्यातील कार्यक्रमात विद्यार्थिनी कोणते प्रश्न उपस्थित करतात आणि राहुल गांधी शिक्षण, रोजगार तसेच महिलांच्या प्रश्नांवर काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पोलिसांची परवानगी मिळाल्याने कार्यक्रमाबाबतचा संभ्रम सध्या दूर झाला असला, तरी कठोर सुरक्षा अटींचे पालन करण्याची मोठी जबाबदारी आयोजकांवर असणार आहे. आता 22 ऑगस्टला पुण्यात होणाऱ्या या कार्यक्रमाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

