पुणे, दि. १९ : गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहत- इंदिरानगर झोपडपट्टीच्या पुनर्वसनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे यांच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या पुनर्वसन योजनेचे प्राथमिक सर्वेक्षण दि. १८ व १९ ऑगस्ट २०२६ रोजी पूर्ण झाले. त्यामुळे या परिसराच्या नियोजित पुनर्विकासाला आता प्रत्यक्ष गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मीनाताई ठाकरे वसाहत ही गुलटेकडी फा.प्लॉट क्र. ४२७ पैकीच्या जागेवरील जुनी झोपडपट्टी असून, मीनाताई ठाकरे व इंदिरा वसाहत मिळून सुमारे १२.५ एकर क्षेत्रावर पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येणार असून उंच इमारती उभारून नागरीकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
जुन्या वस्तीचा नियोजित कायापालट
मीनाताई ठाकरे वसाहतीचा परिसर अनेक वर्षांपासून दाट लोकवस्तीचा भाग आहे, या पार्श्वभूमीवर पुनर्वसनासाठी करण्यात आलेले प्राथमिक सर्वेक्षण महत्त्वाचे मानले जात आहे. सर्वेक्षणा दरम्यान परिसरातील घरांची प्राथमिक नोंदणी करण्यात आली असून, पुढील पात्रता तपासणी, कागदपत्रांची पडताळणी आणि पुनर्वसनाच्या पुढील प्रशासकीय प्रक्रियेसाठी या नोंदीचा आधार घेतला जाणार आहे.
दोन दिवसांत सर्वेक्षण पूर्ण
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सतीशकुमार खडके, (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण अधिकारी श्री.सचिन गोसावी, उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्र.१ यांच्या नेतुत्वात प्राथमिक सर्वेक्षणाचे काम करण्यात आले. पथक प्रमुख श्रीमती प्राजक्ता घोरपडे, तहसिलदार, श्री.राजकुमार गभाले, ना.त., श्रीमती वंदना पवार, अ.का. तसेच प्राधिकरणाचे सर्व्हेक्षक व शिपाई यांच्या पथकाने सर्वेक्षणाची कार्यवाही पूर्ण केली. या मोहिमेत योजना क्षेत्रातील नागरीकांनी तसेच स्थानिक कृतिसमितीने प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे नियोजित कालावधीत प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण करणे शक्य झाले.
हक्काच्या घराकडे पहिले पाऊल
पुनर्वसन प्रकल्पामुळे दीर्घकाळ झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांना नियोजित व सुरक्षित निवासाची संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, सार्वजनिक सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांचे नियोजनबद्ध उन्नतीकरण होण्यासही मदत होणार आहे.
पारदर्शक सर्वेक्षणावर भर
“हे सर्वेक्षण अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडले आहे, पुनर्वसनाच्या पुढील टप्प्यासाठी नागरिकांचे सहकार्य मोलाचे ठरेल,” असे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱी यांनी सांगितले. प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाल्याने आता पुढील प्रशासकीय प्रक्रियेला चालना मिळणार आहे. पात्र झोपडपट्टीधारकांची तपासणी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि पुनर्वसन योजनेच्या पुढील टप्प्यांमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे झोपडपट्टीच्या कायापालटाचा मार्ग मोकळा झालेला असून जवळपास चार दशकांहून अधिक काळ अस्तित्वात असलेल्या या वस्तीच्या पुनर्वसनासाठी प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण होणे हे स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने आशादायी पाऊल ठरले आहे.

