पीडितेचे संरक्षण व तीन दिवसांत कार्यवाही अहवाल देण्याबाबत निवेदन
लातूर, दि. ५ ऑक्टोबर : आदर्श शैक्षणिक कॅम्पसचे संस्थापक व प्राचार्य बशीर शेख यांच्याविरुद्ध अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या आरोपावरून दाखल गुन्ह्याची गंभीर दखल विधान परिषद सदस्या व माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासाठी तयार केलेल्या निवेदनात आरोपीचा तातडीने शोध घेऊन कायद्यानुसार अटक, सखोल तपास आणि पीडितेच्या संरक्षणाबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
प्रसिद्ध वृत्तानुसार, २० सप्टेंबरच्या कथित घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. कठोर कारवाईसाठी पालक, महिला व सामाजिक संघटनांनी ५ ऑक्टोबर रोजी आंदोलन केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या संस्थाप्रमुखाविरुद्ध असे आरोप होणे अत्यंत चिंताजनक आहे. कोणत्याही व्यक्तीचे पद, संस्थेचा प्रभाव अथवा बाह्य दबावामुळे तपासात विलंब होता कामा नये, अशी ठाम भूमिका डॉ. गोऱ्हे यांनी मांडली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निष्पक्ष तपास करून सीसीटीव्ही चित्रण, शाळेतील नोंदी व डिजिटल पुरावे सुरक्षित करावेत. तक्रार दडपण्याचा किंवा पीडितेवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला असल्यास संबंधितांवरही कारवाई करावी, असे निवेदनात नमूद आहे.
पीडितेची ओळख गोपनीय ठेवून समुपदेशन, कायदेशीर सहाय्य व आवश्यक संरक्षण द्यावे. तिच्या शिक्षणात अडथळा येऊ नये याची दक्षता घ्यावी. संस्थेतील पूर्वीच्या संभाव्य तक्रारींची पडताळणी आणि बालसुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचीही सूचना करण्यात आली आहे.
आरोपीच्या अटकेची सद्यस्थिती, पीडितेच्या संरक्षणाचे उपाय व तपासातील प्रगती यांचा प्राथमिक कार्यवाही अहवाल तीन दिवसांत आपल्या कार्यालयास सादर करण्यास डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात सांगितले आहे.

