२०२७ मध्ये हिंदी आणि गुजराती भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित!
काही नाती रक्ताची नसतात, ती श्रद्धेच्या धाग्यांनी जोडलेली असतात… काही प्रवास अंतराचे नसतात, ते विश्वासाच्या बळावर पूर्ण होतात… आणि काही अनुभूती अशा असतात, ज्या शब्दांपलीकडे जाऊन थेट मनाला स्पर्श करतात. अशा अगाध श्रद्धेचा, भक्तीचा आणि बाबा श्याम यांच्या चरणी समर्पित भावविश्वाचा अनुभव प्रेक्षकांना देण्यासाठी ‘श्याम शरणम्’ हा हिंदी चित्रपट सज्ज होत आहे.
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबा श्याम यांच्या पावन जन्मोत्सवाच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचे आकर्षक पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे. ‘श्री श्याम पिक्चर्स प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती संतोष पवार, आदेश पांडे आणि नितीन पोळ यांनी केली आहे. रमेश चौधरी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या पोस्टर अनावरण प्रसंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शक्तिसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या पोस्टरमधून श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची एक सुंदर झलक पाहायला मिळते. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये एका भक्ताचा हातात बाबा श्याम यांची पताका घेऊन सुरू असलेला प्रवास, मागे दिसणारे वाळवंट आणि आकाशात उमटलेले बाबा श्याम यांचे दिव्य स्वरूप लक्ष वेधून घेते. या दृश्यातून भक्तीच्या प्रवासातील श्रद्धा, संघर्ष आणि विश्वासाची अनुभूती मिळते.
‘हारे का सहारा… खाटू श्याम हमारा!’ या भक्तिभावाने ओतप्रोत असलेल्या चित्रपटातून असंख्य श्याम भक्तांच्या भावना, श्रद्धा आणि विश्वास मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहेत. हा केवळ एक चित्रपट नाही, तर प्रत्येक श्याम भक्ताच्या मनातील आस्थेला स्पर्श करणारी ही एक अनोखी सिनेमॅटिक अनुभूती ठरणार आहे.
चित्रपटाची कथा मिलिंद खानविलकर यांची आहे. छायांकनाची (DOP) जबाबदारी सिद्धेश संतोष मोरे यांनी सांभाळली आहे, तर सहयोगी दिग्दर्शक म्हणून मनोज गडकर यांनी काम पाहिले आहे.विशेष म्हणजे, ‘श्याम शरणम्’ हा चित्रपट हिंदी आणि गुजराती या दोन भाषांमध्ये २०२७ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
बाबा श्याम यांच्या चरणी समर्पित भक्तीचा भाव… ‘श्याम शरणम्’चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे!

