जुन्नर -तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (18 ऑगस्ट) दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पीडित मुलगी अचानक घरातून गायब झाल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी दिवसभर तिचा सर्वत्र शोध घेतला. मुलगी सापडत नसल्याने शेवटी कुटुंबीयांनी पोलिसांत ती हरवल्याची तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणानेच तिच्याशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेतला. त्याने चिमुकलीला सायकलवरून जवळच असलेल्या उसाच्या शेतात नेले आणि तेथे तिच्यावर पाशवी अत्याचार केला. शेतात केला अत्याचार घटनेची माहिती देताना पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल म्हणाले की, मंगळवारी (18 ऑगस्ट) दुपारी, पीडित चिमुकली तिच्या घराशेजारील दुसऱ्या मुलांसोबत खेळत होती आणि टीव्ही पाहत होती. याच दरम्यान शेजारी राहणारा एक 25 वर्षांचा तरुण तिला तिथून बाहेर घेऊन गेला. त्याने चिमुकलीला गावाबाहेरील एका शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली.
अत्याचारानंतर गळा दाबून निर्घृण हत्या
तिने अत्याचाराची वाच्यता करू नये म्हणून नराधमाने मुलीच्या गळ्यावर गंभीर जखम करत तिचा गळा दाबून खून केला. तपासादरम्यान पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून, त्यानेच अत्याचार करून हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवाल व पुढील तपासातून पूर्णपणे स्पष्ट होणार आहे.
राज्यकर्ते सुस्त आहेत, याची लाज वाटते- वडेट्टीवार
जुन्नरमधील घटनेवर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनो, तुम्ही निवांत राहा…ही तुमची मुलगी नाही! माणुसकीला काळिमा फासणाऱ्या नसरापूरच्या घटनेनंतर आता जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी येथे एका निष्पाप चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. अशा क्रूर आणि विकृत घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात वारंवार घडत असताना राज्यकर्ते सुस्त आहेत, याची लाज वाटते.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, नरसापूर प्रकरणानंतर आज पुन्हा एका निष्पाप चिमुकलीचा जीव गेला. यावरून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून गुन्हेगारांना काडीचाही धाक उरलेला नाही. रोज महिला आणि निष्पाप मुलींवर अत्याचार होत असताना गृहखाते नेमकं काय करतंय? या प्रकरणातील विकृत नराधमाला तातडीने बेड्या ठोकून, नसरापूर प्रकरणातील आरोपीविरुद्ध ज्याप्रमाणे 16 दिवसांत आरोपपत्र दाखल करून विशेष न्यायालयामार्फत फाशीची शिक्षा सुनावली गेली, तसाच जलद न्याय जुन्नरच्या निष्पाप चिमुकलीला आणि तिच्या पीडित कुटुंबाला मिळाला पाहिजे. या घटनेतील मृत चिमुकलीच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या कुटुंबियांच्या या कठीण दुःखात आम्ही सहभागी आहोत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. विविध तपास यंत्रणांना या प्रकरणाच्या तपासासाठी कामाला लावले आहे. दरम्यान, जुन्नरच्या आमदारांच्याच गावात घडलेल्या या भयानक प्रकारामुळे पिंपळवंडी परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमाला कोणत्याही परिस्थितीत फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी घेतली आहे.

