एमपीएससी आंदोलनात विद्यार्थ्यांना आवाहन; ‘देशाच्या भविष्यासाठी लढा द्या, जास्तीत जास्त संख्येने पुण्यात या’
पुणे : “महाराष्ट्र आणि दिल्ली सांभाळण्याची ताकद मराठी माणसात आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार आणि भीमनवार यांचे राजीनामे होतील. देशाच्या भविष्यासाठी आपण लढा देणे आवश्यक आहे. त्यामुळे मागे हटू नका आणि जास्तीत जास्त संख्येने आंदोलनात सहभागी व्हा,” असे आवाहन कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांना केले.
पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिपके यांनी रविवारी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी आणि मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिपके यांनी आंदोलन दीर्घकाळ चालले तरी मानसिक दबावाला बळी न पडता लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
“विद्यार्थ्यांनो, त्रास सहन करून तुम्हाला आंदोलनाला बसावे लागेल. मानसिक त्रास होईल; पण मागे हटू नका. सरकारकडून दाखल होणाऱ्या केसेसला घाबरू नका,” असे दिपके म्हणाले.
राज्यात सुमारे 20 लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवरही निशाणा साधला. “तुम्हाला अटक करण्याइतके जेल आहेत का? सरकार तुम्हाला केस आणि जेलची भीती दाखवत असेल, तरी अजिबात खचू नका,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
जंतरमंतरवरील आंदोलनाचा अनुभव सांगताना दिपके म्हणाले की, तेथील आंदोलनावेळीही अशाच प्रकारच्या दबावाला सामोरे जावे लागले होते. मात्र आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका सोडली नाही, अशी आठवण त्यांनी सांगितली.
‘पुणे बंद पडेल एवढी संख्या हवी’
विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करताना दिपके यांनी, “आपल्या हक्कासाठी सर्व विद्यार्थ्यांनी पुण्यातील आंदोलनात सहभागी व्हावे. इतक्या मोठ्या संख्येने या की पुणे बंद पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे,” असे म्हटले.
“मी ‘बंद करा’ असे म्हटले तर मुख्यमंत्री अराजकता पसरवत असल्याचा आरोप करतील. पण हा लढा देशाच्या भवितव्याचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे,” असेही दिपके म्हणाले.

