महिला सुरक्षेसह वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची संख्या वाढवून दिवाळीपर्यंत कृती आराखडा तयार करण्याची सूचना
पुणे: पुणे शहरातील राँग साइड वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच सकाळच्या वेळेतही ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ तपासणी मोहीम राबविण्यात यावी. शहरातील वाहतूक कोंडीची ठिकाणे आणि महिला सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील परिसरांची नव्याने पाहणी करून दिवाळीपर्यंत तातडीचा कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना शिवसेना नेत्या, विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या.
पुणे शहरातील रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी आयोजित जिल्हा रस्ता वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी ऑनलाइन सहभाग घेतला. पुणे पोलीस आणि वाहतूक पोलीस गेली अनेक वर्षे शहरातील मोठे उत्सव, यात्रा आणि लाखो नागरिकांची गर्दी असलेले कार्यक्रम उत्तमरीत्या हाताळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांशी संयमाने आणि प्रभावीपणे संवाद साधू शकणाऱ्या कर्मचाऱ्यांची गर्दीच्या ठिकाणी नियुक्ती करण्याची सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी केली.
या बैठकीला, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त, पुणे शहर संजय दराडे,अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर राजेश बनसोडे, पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे, पुणे शहर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी अर्चना गायकवाड, स्वप्नील भोसले, पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक ॲलिस पोरे, महामेट्रो अतिरिक्त महाव्यवस्थापक चंद्रशेखर तांबवेकर, माजी महापौर अंकुश काकडे, माजी खासदार वंदना चव्हाण, नगरसेवक अरुण राजवाडे, शिवसेना कार्यालय प्रमुख सुधीर जोशी यांसह विविध सामाजिक, राजकीय व उद्योग विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शिवाजीनगर, डेक्कनसारख्या सुशिक्षित आणि मध्यवर्ती भागांतही सकाळच्या वेळी अनेक नागरिक राँग साइडने वाहने चालवित असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येते. ही बाब अत्यंत धोकादायक असून अशा वाहनचालकांवर कोणत्याही हस्तक्षेपाला बळी न पडता कठोर कारवाई झाली पाहिजे, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
हिंजवडी परिसरातील अपघाताच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्या म्हणाल्या की, मोठ्या आणि कंत्राटी वाहनांच्या चालकांकडून सकाळच्या वेळेतही मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहीम केवळ रात्रीपुरती मर्यादित न ठेवता सकाळीही राबवावी. विशेषतः शहराच्या प्रवेशद्वारांवर अवजड, प्रवासी आणि कंत्राटी वाहनचालकांची तपासणी करण्यात यावी.
महिलांचा पाठलाग आणि छेडछाडीच्या घटना प्रामुख्याने निर्जन व अंधाऱ्या परिसरात घडत असल्याचे स्त्री आधार केंद्राच्या कामातून निदर्शनास आले होते. सातत्याने दोन वर्षे पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर शहरातील सुमारे ३०० अंधाऱ्या व निर्जन ठिकाणी अतिरिक्त प्रकाशव्यवस्था करण्यात आली. बोपदेव घाट परिसरातही सर्चलाइट बसविण्यात आले आहेत. उर्वरित संवेदनशील ठिकाणांचे नव्याने सर्वेक्षण करून तिथे सीसीटीव्ही, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.
मॉडेल कॉलनीतील दीप बंगला चौक, सिमला ऑफिस परिसर तसेच शहरातील इतर वाहतूक कोंडीच्या ठिकाणांचा समावेश विशेष कृती आराखड्यात करावा. उड्डाणपूल आणि दीर्घकालीन प्रकल्पांसोबतच तातडीने अमलात आणता येतील अशा उपायांवर भर द्यावा. नवले पूल परिसरात केलेल्या उपाययोजनांनंतरही अपघात घडत असल्याने तेथील परिस्थितीचा पुन्हा अभ्यास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या प्रवेशमार्गांचे स्वच्छता व सुशोभीकरण करावे. पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेला राडारोडा तातडीने हटवून दिशादर्शक फलक, रस्त्यांवरील पट्टे आणि प्रकाशव्यवस्था सुधारावी, असेही त्यांनी सांगितले.
पीएमपीएमएलच्या बसेसची संख्या अपुरी असल्यास गर्दीच्या मार्गांवर जादा बसेस सोडण्याचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे. त्यामुळे खासगी वाहनांचा वापर आणि प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. पहाटे व सकाळी सायकल चालविणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निवडक मार्गांवर पोलीस गस्त आणि वाहतूक नियंत्रण वाढवावे, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली. डॉ. नरेंद्र पटवर्धन यांच्यासह सायकलप्रेमी डॉक्टरांच्या गटानेही या प्रश्नाकडे लक्ष वेधल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांसाठी असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती निर्धारित वेळेत पूर्ण करावी. कार्यान्वित स्वच्छतागृहांची अद्ययावत माहिती स्थानासह गुगल मॅपवर उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून महिला आणि प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशी मागणीही त्यांनी केली.
स्त्री आधार केंद्राने पुणे पोलिसांच्या सहकार्याने गेल्या १६ वर्षांपासून महिला सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. विश्रामबाग, स्वारगेट आणि शिवाजीनगर परिसरातील पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात सुमारे २०० महिलांना प्रशिक्षण देऊन सुरक्षित प्रवास व नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी गट तयार करण्यात आले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
पुण्याच्या हितासाठी राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन काम करण्याची परंपरा आहे. मोहन जोशी, अंकुश काकडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींनी बैठकीत मांडलेल्या सूचनांचा विचार करून विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी निश्चित करावी आणि दिवाळीपर्यंतच्या कृती आराखड्याचा नियमित आढावा घ्यावा, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली.

