पिंपरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी जमीन व मालमत्ता विभागाचे उपायुक्त हिम्मत खराडे यांनी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदानाला उजाळा दिला. तसेच, भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा, शौर्य आणि ‘जय जवान, जय किसान’ या मंत्रामागील राष्ट्रसेवेच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण केले. त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीसह प्रशासकीय कामकाजात कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन श्री. खराडे यांनी केले.
याप्रसंगी भूमी अभिलेख विभागाच्या अधीक्षिका आशा जाधव, तहसीलदार अभिजीत जगताप, अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंते शंकर कोळेकर व डी. एम. चौरे, माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे, सहायक जनसंपर्क अधिकारी तुषार बिडवे, कनिष्ठ अभियंता विश्वनाथ क्षीरसागर यांच्यासह ‘पीएमआरडीए’चे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

