पुणे- लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाची बैठक काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीचे आयोजन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी केले होते.
पुण्यात होणाऱ्या जननायक राहुलजी गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज – महिला विशेष’ कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी आज काँग्रेस भवन येथे सायकल प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. पुणे शहरातील विविध भागांत सायकलच्या माध्यमातून कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार करत विद्यार्थिनींना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन दीप्ती चवधरी यांनी केले. त्यापुढे त्या म्हणाल्या की, ‘‘देश सुजलाम् – सुफलाम् करण्यासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. आपल्या देशात युवकांची संख्या म्हणजे जेन – झी मोठी आहे. प्रत्येक पिढी बदलते तसेच युवापिढीही बदलत असते. आजचे युग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. त्यांच्याशी संवाद साधून युवकांचा आत्मविश्वास बळकट करण्याचे काम राहुल गांधी करीत आहेत.’’

यावेळी मार्गदर्शन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ‘‘पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाची कार्यकारिणी जाहिर झाली. आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी ५० महिला, विद्यार्थींनींना राहुल गांधींच्या ‘‘छात्रों की गुंज’’ या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरीता प्रयत्न करावा. राहुल गांधी यांनी देशात अनेक ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेवून ते सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना नविन दिशा देणार. विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. त्यांना योग्य शिक्षण मिळाले तरच योग्य नोकरी मिळेल व त्यांचे भविष्य उज्वल होईल. पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पेपर फुटीचा केंद्रबिंदु पुणे येथे होता आणि ज्या आरोपींना अटक केली ते भाजप व संघाच्या निगडीत असलेल्या संस्थेत कार्यरत होते. काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त महिला व विद्यार्थीनींना २२ ऑगस्टला होणाऱ्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मेहनत करावी.’’
यानंतर अ. भा. काँ. क. चिटणीस व प्रभारी बी. एम. संदिप म्हणाला की, ‘‘छात्रों की गुंज’’ या कार्यक्रमाला देशभरातून विद्यार्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजगी आहे. भाजप सरकारच्या राजवटीमध्ये सातत्याने पेपरफूटी होत आहे. ५० दिवसांच्या विद्यार्थांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. सगळ्यांनी एकजुटीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व पुण्याचे प्रभारी सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले की, ‘‘पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात. UPSC, MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यात अनेक कोचिंग क्लासेस आहे. या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना छात्रों की गुंज कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करावा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी अतिशय कठिण परिस्थितीत समाजाचा विरोध होत असताना सुध्दा पुढाकार घेवून मुलींना शिक्षण दिले. त्यांची प्रेरणा घेवून सावित्रीच्या लेकींनी राहुल गांधींशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न करावा.’’
यावेळी माजी गृहमंत्री रमेश बागवे, शहर उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, राजाभाऊ कदम, मधुकर राऊत, संजय मोरे, भाऊसाहेब आजबे, रविंद्र ननावरे, मिलिंद पोकळे, सुभाष जेधे, धीरज खोरे, सेल्वराज ॲन्थोनी, समद शेख, प्रियंका मधाळे, राजश्री चव्हाण, ऋग्वेदिता सपकाळ, हर्षद हांडे, विक्रम शहाणे, युवराज मदगे, किशोर मारणे, शाम काळे आदी सह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

