प्रभागातील विकासकामांसाठी अर्थसंकल्पात तरतूदच केली नाही ; भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, काँग्रेस मात्र बघ्याच्या भूमिकेत
पुणे : राज्याच्या सत्तेत भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असले, तरी पुणे महापालिकेच्या सभागृहात मात्र या मैत्रीचे वेगळेच चित्र पाहायला मिळाले. “तुमची-आमची मैत्री राज्यात आहे; इथे तुम्हाला अजिबात सहकार्य मिळणार नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अगदी जवळचे नेते म्हणविले जाणारे भाजपचे नेते सभागृहनेते गणेश बिडकर यांनी विरोधी पक्षनेत्यांना आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांना सुनावल्याने भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत तणावाचे वातावरण शहर पातळीवर निर्माण झाले आहे .दरम्यान भाजपने मला संपविण्यासाठी माझ्या वार्डातील जनतेचे हाल व्हावेत म्हणून त्यांच्या विकास कामांना शून्य रुपये ठेवण्याचा केलेला प्रहार हि बदल्याची भावना नागरिक कधीही विसरणार नाही असे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी म्हटले आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपात खटके उडाल्याने भाजपामधून अमोल बालवडकर हे अजित पवार यांना भेटले आणि त्यांच्या पक्षात दाखल झाले त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून महापालिका निवडणुकीत विजय मिळविला . नगरसेवक म्हणून महापालिकेत आल्यावर १५ हजार कोटीचे बजेट असलेल्या महापालिकेत त्यांना वार्डात कामे करायला भाजपने १ रुपयाचीही तरतूद केली नाही आणि ती चूक झाली असे म्हटले . त्यानंतर त्यांच्या वार्डात १२ कोटीची तरतूद स्थायी समितीने वर्गीकरण करून केली आणि आता त्याच स्थायी समिती कडून आज महापालिकेच्या मुख्य सभेत तब्बल ११२ विषय वन के कायद्यांतर्गत आणण्यात आले .यात यंदाच्या स्थायी समिती ठराव क्र.६५, दिनांक-१६/०४/२०२६ या ठरावामधील नमूद प्रभाग क्र.९ ड मधील वर्गीकरणाचा फेर विचार करण्यात यावा. या ठरावाचा समावेश अगोदर करण्यात आला . आणि थेट ११२ विषय न वाचता दाखल करण्याचा प्रयत्न झाला.त्यावेळी कामकाज नियमावली सांगत त्यांना रोखण्याचा प्रयत्न अमोल बालवडकर यांच्या सह विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी केला . यात खडाजंगी झाली आणि बालवडकर यांच्या वार्डातील तरतूद गोठविणारा विषय बहुमताने दाखल मान्य करण्यात आला. यावेळी कॉंग्रेस पक्षाने यावेळी कशा पद्धतीने तटस्थ भूमिका घेतली. नेमके काय झाले कसे झाले त्या साठी पहा हा व्हिडीओ…
“तुमची-आमची मैत्री राज्यात; इथे अजिबात सहकार्य मिळणार नाही” — भर सभागृहात बिडकरांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुनावले
अमोल बालवडकरांच्या प्रभागातील १२ कोटींच्या विकासनिधीचा फेरविचार; मुख्य सभेत खडाजंगी, काँग्रेसची तटस्थ भूमिका
पुणे : राज्याच्या सत्तेत भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असले, तरी पुणे महापालिकेच्या सभागृहात मात्र या मैत्रीचे वेगळेच चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. “तुमची-आमची मैत्री राज्यात आहे; इथे तुम्हाला अजिबात सहकार्य मिळणार नाही,” अशा शब्दांत भाजपचे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना सुनावल्याने सभागृहातील वातावरण तापले. या वक्तव्यानंतर शहर पातळीवर भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील संबंधांबाबत राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
या वादाच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या प्रभागातील विकासकामांचा निधी आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी उमेदवारीच्या मुद्द्यावरून भाजपशी मतभेद झाल्यानंतर बालवडकर यांनी अजित पवार यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळविला.
महापालिकेत नगरसेवक म्हणून आल्यानंतर आपल्या प्रभागातील विकासकामांसाठी अर्थसंकल्पात एक रुपयाचीही तरतूद करण्यात आली नसल्याचा आरोप बालवडकर यांनी केला होता. सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या महापालिका अर्थसंकल्पात आपल्या प्रभागासाठी शून्य तरतूद ठेवण्यात आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ही बाब चुकून झाल्याचे सांगण्यात आले आणि स्थायी समितीमार्फत वर्गीकरण करून त्यांच्या प्रभागासाठी सुमारे १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
मात्र याच निधीचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थायी समिती ठराव क्र. ६५, दिनांक १६ एप्रिल २०२६ मधील प्रभाग क्रमांक ९ ड मधील वर्गीकरणाचा फेरविचार करण्यात यावा, असा विषय महापालिकेच्या मुख्य सभेसमोर आणण्यात आला. हा विषय स्थायी समितीकडून आलेल्या मोठ्या संख्येतील विषयांमध्ये समाविष्ट करण्यात आला होता.
मुख्य सभेत एकाचवेळी तब्बल ११२ विषय दाखल करून मंजुरीसाठी घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला. विषय न वाचता ते मंजूर करू नयेत, कामकाज नियमावलीनुसार प्रक्रिया राबवावी, अशी भूमिका विरोधी पक्षनेते निलेश निकम आणि नगरसेवक अमोल बालवडकर यांनी घेतली. यावरून सभागृहात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
याच दरम्यान सभागृहनेते गणेश बिडकर यांनी “तुमची-आमची मैत्री राज्यात आहे; इथे अजिबात सहकार्य मिळणार नाही,” अशा आशयाचे वक्तव्य केल्याने वाद आणखी चिघळला. अखेर बालवडकर यांच्या प्रभागातील तरतुदीचा फेरविचार करणारा विषय बहुमताने दाखल करून घेण्यात आला.
या संपूर्ण घडामोडीवर अमोल बालवडकर यांनी भाजपवर थेट राजकीय सूडबुद्धीचा आरोप केला. “मला राजकीयदृष्ट्या संपविण्यासाठी आणि माझ्या प्रभागातील नागरिकांना विकासकामांपासून वंचित ठेवण्यासाठी निधी रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बदल्याची भावना नागरिक कधीही विसरणार नाहीत,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
विशेष म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये सुरू असलेल्या या संघर्षात काँग्रेसने तटस्थ भूमिका घेतल्याचे चित्र सभागृहात दिसले. त्यामुळे महायुतीतील दोन पक्षांमधील संघर्षाबरोबरच विरोधी बाकांवरील राजकीय समीकरणांचीही चर्चा सुरू झाली आहे.
बालवडकर यांनी यानंतर आपल्या प्रभागातील विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याची भूमिका मांडली आहे.
राज्यात भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी सत्तेत एकत्र असताना पुणे महापालिकेत मात्र विकासनिधीच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांतील तणाव उघडपणे सभागृहात समोर आल्याने “राज्यात मित्र; महापालिकेत मात्र संघर्ष” असे चित्र निर्माण झाले आहे.
नेमके सभागृहात काय झाले? गणेश बिडकर काय म्हणाले? अमोल बालवडकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम आणि महापौर मंजुषा नागपुरे यांनी या वादावर काय भूमिका मांडली? पाहा व्हिडिओ…
राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा, मी उपमुख्यमंत्री सुनेत्रावाहिनी आणि पार्थ दादांकडून विकास कामांसाठी तरतूद मिळवेल : अमोल बालवडकर
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांसाठी प्रस्तावित विविध विकासकामांचा निधी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत फेरविचाराचा प्रस्ताव आणून रद्द करण्यात आला असून, हा निर्णय राजकीय वैमनस्यातून घेण्यात आल्याचा आरोप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला आहे.प्रभाग क्रमांक ९ मधील रस्ते, ड्रेनेज, उद्याने तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित विविध विकासकामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय हस्तक्षेपातून महानगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या विषयाचा फेरविचार करण्याचा प्रस्ताव मुख्य सभेत आणण्यात आला आणि अखेर संबंधित विकासकामांचा निधी रद्द करण्यात आल्याचा आरोप बालवडकर यांनी केला.यापूर्वी प्रभागातील विकासकामे आणि निधीतील कामांचे ‘स्पेशल ऑडिट’ करण्याचा विषय पुढे आणण्यात आला होता. त्यानंतर आता प्रत्यक्ष विकासकामांचा निधीच रद्द करण्यात आल्यामुळे हा प्रकार केवळ अमोल बालवडकर यांच्या विरोधातील राजकीय भूमिका नसून प्रभाग क्रमांक ९ मधील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासावर परिणाम करणारा निर्णय आहे, असे बालवडकर यांनी म्हटले आहे.“राजकीय मतभेद माझ्याशी असतील तर राजकीय पातळीवर लढा. मात्र त्यासाठी प्रभाग क्रमांक ९ मधील जनतेच्या हक्काची विकासकामे रोखणे योग्य नाही. रस्ते, ड्रेनेज, उद्याने आणि मूलभूत सुविधा ही माझी वैयक्तिक कामे नसून नागरिकांची गरज आणि त्यांचा हक्क आहे,” असे अमोल बालवडकर म्हणाले.निधी रद्द झाल्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील अनेक नियोजित विकासकामांना खीळ बसणार असून त्याचा थेट फटका नागरिकांना बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.“स्वतः काम करायचे नाही आणि दुसऱ्यालाही काम करू द्यायचे नाही, अशी ‘ना काम करुंगा, ना करने दुंगा’ भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याचे या निर्णयातून स्पष्ट होते. राजकीय वैमनस्यातून जनतेच्या विकासकामांमध्ये अडथळे आणणे हे कोथरूडच्या नागरिकांवर अन्याय करणारे आहे,” अशी टीका अमोल बालवडकर यांनी केली.मात्र, अशा राजकीय अडथळ्यांमुळे प्रभागाच्या विकासाची गती थांबणार नाही, असे स्पष्ट करत बालवडकर म्हणाले, “स्व. अजितदादा पवार यांनी नेहमीच विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत काम करण्याचा विचार दिला. त्यांचा हाच विकासाचा विचार पुढे नेत आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार आणि खासदार पार्थदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ९ आणि परिसरातील विकासकामे यापुढेही अधिक जोमाने आणि ताकदीने सुरू ठेवणार आहोत. राजकीय अडथळे कितीही आले तरी जनतेच्या विकासासाठी आमचे काम थांबणार नाही.”महानगरपालिकेचा विकास निधी हा कोणत्याही व्यक्तीचा नसून नागरिकांच्या करातून त्यांच्या सुविधांसाठी उपलब्ध होणारा निधी आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील रद्द करण्यात आलेल्या विकासकामांच्या निधीचा निर्णय तातडीने मागे घेऊन सर्व नियोजित विकासकामे पूर्ववत सुरू करण्यात यावीत, अशी मागणी अमोल बालवडकर यांनी केली.“राजकीय संघर्ष जरूर करा; पण त्यासाठी प्रभाग क्रमांक ९ आणि कोथरूडच्या नागरिकांचा विकास वेठीस धरू नका,” असे आवाहनही त्यांनी केले.

