“सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करणारे राष्ट्रद्रोही नव्हे, राष्ट्रहितैषी”; ‘दिमागी नक्सल’ वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींवर काँग्रेसची टीका
पुणे: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे २२ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार असून विद्यार्थ्यांच्या समस्या आणि तरुणाईच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न जाणून घेणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिली आहे.
यावेळी तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित ‘दिमागी नक्सल’ वक्तव्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करणारे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते किंवा नागरी समाजातील घटक हे राष्ट्रद्रोही नसून लोकशाही व्यवस्थेत राष्ट्रहितासाठी भूमिका मांडणारे नागरिक आहेत, असे तिवारी यांनी प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे.
“सत्ताधाऱ्यांच्या दोषांवर बोट ठेवणाऱ्यांना नक्षलवादी ठरविणे ही सत्तालोलुप आणि स्वार्थी मानसिकता आहे. लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारण्याचा आणि स्वतंत्र विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला घटनात्मक अधिकार आहे,” अशी भूमिका तिवारी यांनी मांडली.
भारताला ‘लोकशाहीची जननी’ म्हणून संबोधले जात असताना सरकारच्या धोरणांशी असहमती व्यक्त करणाऱ्यांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे लोकशाहीच्या मूल्यांना धरून नसल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थी, तरुण, शेतकरी आणि छोट्या उद्योजकांच्या प्रश्नांवर विविध स्तरांतून आवाज उठविला जात असून त्याकडे सरकारने लोकशाही मार्गाने पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तिवारी यांनी केंद्र सरकारवर स्वायत्त संस्थांच्या दुरुपयोगाचाही आरोप केला. संसद, संविधान आणि नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचा सन्मान करण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर असून टीका करणाऱ्यांना विरोधक किंवा राष्ट्रविरोधी ठरविण्याची प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक असल्याचा दावा त्यांनी केला.
विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
दरम्यान, राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याबाबत तिवारी म्हणाले की, विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंबंधी अडचणी, रोजगार, तरुणांचे भवितव्य आणि अन्य ज्वलंत प्रश्न त्यांच्यासमोर मांडण्याची ही संधी असून विद्यार्थी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही गोपाळदादा तिवारी यांनी केले.

