पेट्रोलियम मंत्रालयाचे स्पष्टीकरण—e-KYC बाकी असलेल्या ग्राहकांनी प्रक्रिया पूर्ण करावी; सिलेंडरचा पुरवठा थांबणार नाही
नवी दिल्ली : घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी आधार-आधारित बायोमेट्रिक e-KYC करण्याची 16 ऑगस्ट 2026 ही अंतिम मुदत असल्याचे संदेश सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून प्रसारित होत आहेत. मात्र केंद्र सरकार किंवा प्रमुख तेल विपणन कंपन्यांकडून 16 ऑगस्ट ही सर्व LPG ग्राहकांसाठी अंतिम मुदत असल्याची अधिकृत पुष्टी आढळत नाही.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने यापूर्वी स्पष्ट केले आहे की, ज्या LPG ग्राहकांचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अद्याप झालेले नाही, त्यांनाच e-KYC पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. सामान्य म्हणजेच non-PMUY ग्राहकांनी यापूर्वी e-KYC केले असल्यास ते पुन्हा करण्याची गरज नाही.
सिलेंडरचा पुरवठा बंद होणार नाही
मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार e-KYC प्रक्रिया प्रलंबित असली तरी LPG refill चा पुरवठा प्रभावित केला जाणार नाही. त्यामुळे e-KYC न झाल्यास तत्काळ गॅस कनेक्शन बंद होईल किंवा घरगुती सिलेंडरऐवजी व्यावसायिक दराने सिलेंडर घ्यावा लागेल, अशा दाव्यांना अधिकृत आधार आढळत नाही.
उज्ज्वला ग्राहकांसाठी काय नियम?
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. अधिकृत PMUY संकेतस्थळावरही e-KYC करण्यासाठी तेल कंपनीचे अधिकृत मोबाइल ॲप आणि Aadhaar FaceRD ॲप वापरण्याची सुविधा दिली आहे.
सरकारने मार्च 2026 मध्ये दिलेल्या स्पष्टीकरणानुसार PMUY ग्राहकांना लक्षित DBT सबसिडीच्या पात्रतेसाठी आर्थिक वर्षात एकदा e-KYC करावे लागते. विशेषतः सात refill नंतरच्या आठव्या आणि नवव्या refill वरील लक्षित सबसिडीसाठी ही पडताळणी महत्त्वाची आहे.
इंडियन ऑइलनेही फेब्रुवारी 2026 मध्ये PMUY ग्राहकांना बायोमेट्रिक e-KYC पूर्ण करण्याचे आवाहन करताना LPG refill पुरवठा सुरूच राहील, असे स्पष्ट केले होते.
e-KYC कशी करावी?
ग्राहक संबंधित तेल कंपनीच्या अधिकृत मोबाइल ॲपच्या माध्यमातून घरबसल्या फेस-आधारित बायोमेट्रिक e-KYC करू शकतात. तसेच LPG वितरक किंवा सिलेंडर वितरण कर्मचाऱ्याच्या अधिकृत उपकरणाद्वारेही प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा आहे.
महत्त्वाचे : त्यामुळे “आज रात्री 12 नंतर e-KYC नसेल तर सिलेंडर महाग मिळेल किंवा बुकिंग बंद होईल” अशा संदेशांवर विश्वास ठेवण्याआधी ग्राहकांनी आपल्या तेल कंपनीच्या अधिकृत माध्यमातून माहितीची खात्री करावी.

