स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पॉकेट स्क्वेअरची चर्चा; काँग्रेसने उपस्थित केला तिरंग्याच्या रंगांच्या क्रमाचा मुद्दा
नवी दिल्ली : देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. मात्र त्यांच्या भाषणाबरोबरच यंदाचा त्यांचा खास पोशाखही चर्चेत आला आहे. विशेषतः जॅकेटच्या खिशात लावलेल्या तिरंगी रंगांच्या पॉकेट स्क्वेअरवरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी यंदा पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा, चॉकलेट-ब्राऊन रंगाचे नेहरू जॅकेट आणि लाल रंगाचा पारंपरिक बंधणी साफा परिधान केला होता. जॅकेटच्या खिशात केशरी, पांढरा आणि हिरवा या रंगांचा समावेश असलेला पॉकेट स्क्वेअरही त्यांच्या पोशाखाचा भाग होता.
मात्र पॉकेट स्क्वेअरमध्ये दिसणाऱ्या रंगांच्या मांडणीवर काँग्रेसने आक्षेप घेतला. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सोशल मीडियावर त्यावर उपरोधिक टिप्पणी केली. रंगांचा क्रम भारताच्या राष्ट्रध्वजाऐवजी आयर्लंडच्या ध्वजासारखा भासत असल्याचा टोला काँग्रेसकडून लगावण्यात आला.

यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच पंतप्रधानांच्या पोशाखातील या छोट्याशा तपशिलावरून राजकीय चर्चा रंगली. सोशल मीडियावरही पॉकेट स्क्वेअरमधील रंगांच्या क्रमाबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.
दरम्यान, स्वातंत्र्यदिनी वेगवेगळ्या रंगांच्या पारंपरिक पगड्या आणि भारतीय वस्त्रपरंपरेचे दर्शन घडवणारा पोशाख परिधान करण्याची पंतप्रधान मोदींची परंपरा आहे. यंदा त्यांनी लाल बंधणी साफा आणि ब्राऊन नेहरू जॅकेटला पसंती दिली.


