महापुरुषांना अभिवादन; आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित, सायकल रॅलीचेही आयोजन
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवारी, १५ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणात महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महापौर मंजुषा नागपुरे यांनी महापालिका प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर उपस्थितांनी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटले. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि ध्वजवंदन झाल्यानंतर राष्ट्रगीत तसेच महाराष्ट्राचे राज्यगीत सादर करण्यात आले.
यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे खातेप्रमुख, उपायुक्त, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य सायकल रॅली
ध्वजवंदनानंतर पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने आणि पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या सहकार्याने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत मोठ्या संख्येने सायकलस्वार सहभागी झाले.
महापौर मंजुषा नागपुरे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते झेंडा दाखवून सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली.
ही रॅली पुणे मनपा भवन – मॉडर्न कॅफे – जंगली महाराज रस्ता – खंडोजी बाबा चौक – अलका टॉकीज चौक – टिळक रोड – पुरम चौक – बाजीराव रस्ता – शनिवारवाडा – पुणे मनपा भवन या मार्गाने काढण्यात आली. मनपा भवन येथे रॅलीचा समारोप झाला.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने महापालिका परिसरात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागामुळे सोहळ्याला उत्साहपूर्ण स्वरूप प्राप्त झाले.

