पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी देशभरात पाळल्या जाणाऱ्या ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त भारतीय जनता पक्ष, पुणे शहराच्या वतीने टिळक पुतळा परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारताच्या फाळणीदरम्यान प्राण गमावलेल्या नागरिकांना तसेच विस्थापित झालेल्या लाखो कुटुंबांच्या वेदनांना स्मरण करून देत इतिहासातील या काळ्या पर्वाचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमास कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ मोहन शेटे, नगरसेवक बाप्पू मानकर, स्वरदा बापट, स्वप्नाली पंडित, राजेंद्र काकडे, उदय लेले, प्रियांका शेंडगे, सरचिटणीस दीपक पोटे, सुशील मेंगडे, महिला अध्यक्ष मनीषा लडकत, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले की, “१४ ऑगस्ट हा आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी दिवस आहे. देशाचे विभाजन होऊन एका भूभागापासून स्वतंत्र देशाची निर्मिती झाली. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रभक्तांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.” लोकमान्य टिळकांच्या साक्षीने हा कार्यक्रम होत असल्याचे सांगत, केवळ काळा दिवस म्हणून स्मरण न करता राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांच्या स्वप्नांप्रती आपली बांधिलकी व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याचे रासने यांनी नमूद केले.
भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी फाळणीच्या वेदनांना ‘भळभळणारी जखम’ असे संबोधले. ते म्हणाले की, “१४ ऑगस्ट १९४७ रोजी अखंड भारताची फाळणी झाली. या काळ्या दिवसाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी देशभर विभाजन विभीषिका स्मृती दिन पाळला जातो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात पुणे शहराचे योगदान मोठे असून, अनेक क्रांतिकारकांनी या भूमीतून स्वातंत्र्यलढ्याला दिशा दिली.”
फाळणीच्या काळात सामान्य नागरिकांवर झालेले अत्याचार, विस्थापन आणि मोठ्या प्रमाणावरील जीवितहानी यांचे स्मरण करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे घाटे यांनी सांगितले. स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून देश उभा राहिला असून, त्यांचे स्मरण केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. “अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देण्याचा संकल्प केला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ मोहन शेटे यांनी आपल्या मार्गदर्शनात फाळणीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की, वर्षभरात अनेक आनंदाचे दिवस आपण उत्साहाने साजरे करतो; मात्र १४ ऑगस्ट हा असा दिवस आहे, जेव्हा देशाच्या इतिहासातील एका अत्यंत वेदनादायी पर्वाचे स्मरण करण्यासाठी आपण एकत्र येतो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, परंतु त्याच वेळी देशाच्या फाळणीचे दुःखही भारतीयांच्या वाट्याला आले.
“इतिहास केवळ भूतकाळात रमण्यासाठी नसतो. भूतकाळातील चुका समजून घेऊन त्या पुन्हा होऊ नयेत, यासाठी इतिहासाचे स्मरण आवश्यक असते,” असे शेटे यांनी सांगितले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील विविध टप्पे, क्रांतिकारकांचे योगदान, फाळणीच्या काळातील परिस्थिती आणि त्यानंतर निर्माण झालेल्या सामाजिक-राजकीय परिणामांचा त्यांनी आढावा घेतला.
पुणे शहराची क्रांतिकारकांची समृद्ध परंपरा अधोरेखित करताना त्यांनी वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, लहुजी वस्ताद यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत विविध ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांनी राष्ट्राच्या स्वाभिमानासाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
फाळणीच्या वेदनादायी इतिहासाचे स्मरण करताना भविष्यात देश अधिक मजबूत, एकसंध आणि सामर्थ्यवान करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता, जागरूकता आणि ऐतिहासिक जाणिवा आवश्यक असल्याचे शेटे यांनी प्रतिपादन केले. “आजचा दिवस केवळ स्मरणाचा नसून संकल्पाचा दिवस आहे,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने फाळणीच्या काळातील घटनांवर आधारित माहिती व छायाचित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. उपस्थितांनी या प्रदर्शनाला भेट देऊन फाळणीच्या इतिहासाची माहिती घेतली.
कार्यक्रमातून फाळणीच्या काळात प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच स्वातंत्र्यलढ्यातील बलिदान आणि त्यातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी इतिहासाचे स्मरण ठेवत राष्ट्रहित, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
विभाजन विभीषिका ही भळभळणारी जखम : धीरज घाटे
Date:

