दोन वाहने जप्त; आरोपीविरुद्ध पुणे शहर व ग्रामीण भागात यापूर्वी २० गुन्हे दाखल
पुणे : वारजे माळवाडी पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यातील एका सराईत आरोपीला अटक करून दोन वाहनचोरी आणि एका घरफोडीच्या गुन्ह्याची उकल केली आहे. आरोपीकडून चोरीची दोन वाहने जप्त करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध पुणे शहर आणि पुणे ग्रामीण हद्दीत यापूर्वी तब्बल २० गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर परिसरातील अजिंक्य नगरीजवळ निकुंज अपार्टमेंटसमोरून ३० जुलै रोजी एक ह्युंडाई एक्सेंट कार चोरीला गेली होती. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे शाहरुख राजू पठाण (वय ३०, रा. थेऊर, पुणे) याला १२ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची ह्युंडाई एक्सेंट कार जप्त करण्यात आली.
चौकशीदरम्यान आरोपीने या कारचा वापर पुणे ग्रामीण भागातील एका घरफोडीच्या गुन्ह्यात केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी घोडेगाव पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल आहे.
तसेच आरोपीने यापूर्वी वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवणे औद्योगिक परिसरातून चोरी केलेली महिंद्रा बोलेरो पिकअप देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
अटक आरोपीला १३ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास पोलिस हवालदार मनोज पवार करीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी संजय नरळे आणि वारजे माळवाडी पोलिसांच्या पथकाने केली.

