महाराष्ट्राच्या जडणघडणीतील अपरिचित कथा, इतिहास आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न
पुणे (शरद लोणकर ) : महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास आणि त्यामागील रंजक व तुलनेने अपरिचित कथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी रेडिओ मिर्चीने ‘असा घडला महाराष्ट्र’ या नव्या रेडिओ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्या आवाजातून आणि निवेदनातून महाराष्ट्राच्या इतिहासातील विविध पैलूंवर या कार्यक्रमातून प्रकाश टाकला जाणार आहे.
या शोचा शुभारंभ २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत होणार आहे. त्यानंतर सोमवार ते शुक्रवार हा कार्यक्रम सकाळी ८ ते १० आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत प्रसारित केला जाणार आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या शहरांमध्ये हा शो ऐकता येणार आहे. शनिवार आणि रविवारच्या वेळा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत.
विधी महाविद्यालय रस्त्यावरील लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कार्यालयात बुधवारी या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. यावेळी सुबोध भावे यांच्यासह लोकमान्य मल्टिपर्पजचे विभागीय प्रमुख सुशील जाधव, रेडिओ मिर्चीचे व्यवसाय प्रमुख जयेश पाटील, प्रादेशिक प्रमुख पुनीत केळकर, आरजे विभागाच्या प्रमुख स्मिता रणदिवे, राहुल गजबार आदी उपस्थित होते.
लोकमान्य मल्टिपर्पज, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे.
सुबोध भावे म्हणाले, “महाराष्ट्र हा आपला मोठा परिवार आहे. आपल्या कुटुंबातील जुन्या गोष्टी जशा प्रेरणा देतात, तशाच महाराष्ट्राच्या जडणघडणीतील अनेक अपरिचित आणि रंजक कथा या कार्यक्रमातून समोर आणण्याचा प्रयत्न आहे. मातीशी असलेली आपली नाळ पुन्हा जोडण्याचा हा उपक्रम आहे.”
रेडिओ माध्यमाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, चेहरा न दाखवता केवळ आवाजातून श्रोत्यांना जोडून ठेवणे हे आव्हानात्मक आहे. रेडिओ मिर्चीच्या टीमने या कार्यक्रमासाठी मोठा अभ्यास करून विश्वसनीय माहिती गोळा केली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा संदर्भ देत भावे यांनी समाजाने केवळ उत्सवी स्वरूपात नव्हे, तर त्यांच्या विचारांचे आचरण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. मराठी भाषा बोलण्याचा अभिमान बाळगावा आणि आपल्या इतिहासाशी नाते दृढ करावे, असा संदेशही त्यांनी दिला.
रेडिओ मिर्चीचे व्यवसाय प्रमुख जयेश पाटील यांनी सांगितले की, सततच्या नकारात्मक वातावरणात सकारात्मक आणि प्रेरणादायी कथा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
लोकमान्य मल्टिपर्पजचे विभागीय प्रमुख सुशील जाधव यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती देताना सांगितले की, संस्था १९९५ पासून कार्यरत असून पुण्यातील कामकाजाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. संस्थेच्या २१३ शाखा असून सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे निमी यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्मिता रणदिवे यांनी केले.

