पुणे, दि.१३: ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार’ तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना देण्यात येणाऱ्या ‘डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र)’ पुरस्काराकरिता २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून नागरिकांना अधिक चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार’ पुरस्कार तसेच भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने ‘डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र)’ देण्यात येतात.
राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे १ लाख रुपये, ७५ हजार, ५० हजार, २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.
तसेच प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना राज्यस्तरावरील पुरस्कारांतर्गत ५० हजार रुपये तर प्रत्येक महसुली विभागासाठी २५ हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.
२०२५-२६ या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्र) यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह तीन प्रतीत आपल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असेही राज्याचे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

