वैध उत्पन्नापेक्षा १८.४७ टक्के अधिक मालमत्ता असल्याचे चौकशीत निष्पन्न; हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा
पुणे : येथील टाऊन प्लॅनिंग विभागातील सहायक नगर रचनाकार विकास किसन ढेकळे यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या खुल्या चौकशीत त्यांच्या वैध उत्पन्नाच्या तुलनेत २ कोटी ७८ लाख ४१ हजार ५४२ रुपयांची, म्हणजे १८.४७ टक्के अपसंपदा असल्याचे आढळल्याचा दावा ACBने केला आहे. या प्रकरणात ढेकळे आणि त्यांची पत्नी भाग्यश्री विकास ढेकळे यांच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ACBच्या माहितीनुसार, विकास ढेकळे यांच्याविरुद्ध यापूर्वी झालेल्या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश १९ जून २०२४ रोजी देण्यात आले होते. त्यानंतर १७ ऑगस्ट १९९९ ते २० मार्च २०२५ या तपासणी कालावधीतील उत्पन्न, खर्च आणि मालमत्तेचा तपशील तपासण्यात आला.
या पडताळणीत वैध उत्पन्नाच्या तुलनेत २.७८ कोटी रुपयांहून अधिक अपसंपदा आढळल्याचे ACBने नमूद केले आहे.
पत्नी भाग्यश्री ढेकळे यांनी कथित अपसंपदा धारण करण्यास अपप्रेरणा दिल्याचा तसेच उघड चौकशीदरम्यान मालमत्तेबाबत चुकीची माहिती सादर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी १२ ऑगस्ट २०२६ रोजी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२६/२०२६ नोंदविण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

