‘द गार्डन ऑफ प्रॉस्पेरिटी’मधून अकबर-बिरबल सांगणार गुंतवणुकीचे धडे; मराठीसह १२ भाषांमध्ये उपलब्ध
मुंबई, दि. १३ ऑगस्ट २०२६ : गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता वाढविणे आणि विचारपूर्वक आर्थिक नियोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडने (CDSL IPF) अमर चित्र कथाच्या सहकार्याने बहुभाषिक गुंतवणूकदार शिक्षण माहितीपट सादर केला आहे.
‘द गार्डन ऑफ प्रॉस्पेरिटी’ या अॅनिमेटेड माहितीपटातून अकबर आणि बिरबल या लोकप्रिय व्यक्तिरेखांच्या माध्यमातून गुंतवणुकीतील महत्त्वाच्या संकल्पना सोप्या आणि रंजक पद्धतीने समजावून सांगण्यात आल्या आहेत.
या कथेत अकबर आणि बिरबल एका नवविवाहित जोडप्याला लग्नात मिळालेल्या भेटवस्तू आणि आर्थिक साधनांचा योग्य पद्धतीने उपयोग कसा करावा, याचे मार्गदर्शन करताना दाखविण्यात आले आहे. बागेची निगा राखण्याच्या उदाहरणातून उद्दिष्टाधारित गुंतवणूक, गुंतवणुकीतील विविधता, अल्प आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांचे नियोजन तसेच आपत्कालीन निधीचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे.
मराठीसह १२ भाषांमध्ये माहितीपट
हा माहितीपट इंग्रजी, हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया आणि आसामी अशा १२ भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.
यामुळे शहरी भागासोबतच ग्रामीण आणि विविध भाषिक प्रदेशांतील गुंतवणूकदारांपर्यंत आर्थिक शिक्षण अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा CDSL IPFचा प्रयत्न आहे.
CDSL IPF सचिवालय प्रमुख सुधीश पिल्लई यांनी सांगितले की, गुंतागुंतीच्या आर्थिक संकल्पना परिचित कथा आणि व्यक्तिरेखांच्या माध्यमातून मांडल्यास त्या सर्वसामान्यांना अधिक सहज समजू शकतात. अकबर-बिरबल यांच्या कथांशी आर्थिक नियोजनाचे व्यावहारिक धडे जोडल्यामुळे विविध वयोगटांतील नागरिकांना गुंतवणूक समजून घेणे सोपे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कॉमिक्समधूनही गुंतवणूकदार शिक्षण
CDSL IPF आणि अमर चित्र कथा यांच्याकडून आर्थिक शिक्षणासाठी अशाच स्वरूपाची मालिका विकसित केली जात आहे. याअंतर्गत ‘द अनऑफिशियल उस्ताद’ आणि ‘द गोल्डन पीकॉक फ्रॉड’ यांसारख्या कॉमिक्सचाही समावेश करण्यात आला आहे.
गुंतवणूकदारांना आर्थिक फसवणुकीपासून सावध राहणे, योग्य नियोजन करणे आणि सिक्युरिटीज मार्केटमध्ये जबाबदारीने सहभागी होण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
देशभरातील गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना #AtmanirbharInvestor बनविण्यासाठी आर्थिक साक्षरतेला चालना देण्याची आपली भूमिका कायम असल्याचे CDSL IPFने म्हटले आहे.


