पुणे, दि. ११ : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने सन २०२६-२७ साठी कृषी विभागामार्फत ९ खरीप पिकांसाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य राज्यांतर्गत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
पीक स्पर्धेतील विजेत्यांना तालुकापातळीवर ५ हजार, ३ हजार व २ हजार, जिल्हा पातळीवर १० हजार, ७ हजार व ५ हजार तर राज्य पातळीवर ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपये अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात येईल. पीकस्पर्धेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

