७२३ गृहनिर्माण सोसायट्यांमधील १ लाख ६६ हजारांहून अधिक ग्राहकांशी थेट संवाद
पुणे, दि. १२ ऑगस्ट २०२६ : स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनातील शंका, प्रश्न आणि गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. परिमंडलातील विविध मंडलांचे अधिकारी व कर्मचारी दररोज विविध गृहनिर्माण सोसायट्या, निवासी परिसर आणि ग्राहकांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीची माहिती देत आहेत. ग्राहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यावर या मोहिमेत विशेष भर देण्यात आला आहे.
पुणे परिमंडलात जुलै महिन्यात तब्बल ७२३ गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जनजागृती मेळावे घेण्यात आले. त्यामध्ये १ लाख ६६ हजार ४०० ग्राहकांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमादरम्यान ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या १,२७४ वीजबिलविषयक तक्रारींपैकी ९१८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
स्मार्ट मीटरविषयी माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पुणे शहरात दोन ‘एलईडी व्हॅन’ गर्दीच्या ठिकाणी फिरत असून, त्याद्वारे स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धती व फायद्यांची माहिती देणारे व्हिडीओ दाखवून ग्राहकांचे प्रबोधन केले जात आहे.
स्मार्ट मीटरचे प्रमुख फायदे
दिवसा वीज वापरावर सवलत : सकाळी ९ ते सायं. ५ या दिवसाच्या वेळेत वीज वापराचे नियोजन केल्यास ग्राहकांना वीजखर्चात प्रतियुनिट ८५ पैशांची बचत करता येते.
अचूक आणि मानवी हस्तक्षेपविरहित बिलिंग : स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडिंगची प्रक्रिया अधिक स्वयंचलित होत असल्याने मानवी हस्तक्षेप कमी होऊन बिलिंग प्रक्रियेत अधिक अचूकता व पारदर्शकता येण्यास मदत होते.
वीज वापराचे नियोजन : वीज वापराबाबतची माहिती महावितरणच्या ॲपद्वारे उपलब्ध झाल्याने ग्राहकांना आपल्या दैनंदिन वीज वापरावर लक्ष ठेवता येते आणि अनावश्यक वीज वापर कमी करून वीजखर्चाचे नियोजनही करता येते.
या जनजागृतीदरम्यान स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनात असलेल्या विविध शंकांचे प्रत्यक्ष संवादातून निरसन केले जात आहे. पुणे परिमंडलातील ही व्यापक जनजागृती मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.
“स्मार्ट मीटर ही केवळ मीटर बदलण्याची प्रक्रिया नसून ग्राहकांना त्यांच्या वीज वापराबाबत अधिक माहिती, पारदर्शकता आणि नियंत्रण देणारी आधुनिक व्यवस्था आहे. त्यामुळे ग्राहकांनी स्मार्ट मीटरबाबत कोणताही गैरसमज न ठेवता महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्याची कार्यपद्धती आणि फायदे समजून घ्यावेत. ग्राहकांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन संवाद साधत आहेत. या जनजागृती मोहिमेत ग्राहकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.”
— सुनिल काकडे, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल

