पुणे-
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणजे मुक्त विद्यापीठ होते. त्यांनी केलेली विविध आंदोलने, शंकराचार्यांना दिलेले चर्चेचे आव्हान, युक्रांद, सत्याग्रही विचारधारा, सहवासातून समजलेले व्यक्तिमत्व याबद्दल मान्यवरांकडून डॉ. कुमार सप्तर्षींच्या आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी ४० कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
पुण्याच्या कोथरूड येथील गांधीभवन येथे ९ ऑगस्ट या क्रांती दिनी ३४ व्या गांधी दर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवक क्रांती दलाचा रौप्य महोत्सवही या दिवशी साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने रक्तदान शिबिर, चित्रपट, पुस्तक प्रकाशन आणि युवक क्रांती दलाच्या कार्याच्या आठवणी तसेच युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या स्मृतींना उजाळा देणारी मनोगते यांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यामाने याचे आयोजन करण्यात आले.
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला ‘अंकुर’ चित्रपट यावेळी दाखवण्यात आला. ज्येष्ठ लेखक शंकर निकम यांनी लिहलेल्या ‘आशियाचा दीपस्तंभ जवाहरलाल नेहरू’ या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबीर व अंकुर चित्रटाचे प्रदर्शन झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त रमेश आढाव , मच्छिंद्र गोरडे, एम. एस.जाधव , सुनील पाटील यावेळी उपस्थित होते
मधू मोहिते, सुशीला मोराळे, अंजली सोमण, अंजली कुलकर्णी, विकास लवांडे, अॅड. गोपाळ गुणाले, सुदर्शन चकाले, सचिन पांडुळे, कॉम्रेड किशोर ढमाले, विमल पाटील आदींनी कुमार सप्तर्षी व युक्रांद मधील आठवणी सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या. या सत्राचे अध्यक्ष विश्वस्त सचिव अन्वर राजन होते.
मधू मोहिते म्हणाले की, युवक क्रांती दल म्हटले की डॉ. कुमार सप्तर्षी हे नाव डोळ्यासमोर येते. दलित जाती या क्रांतीच्या दूत आहेत अशी भूमिका डॉ. सप्तर्षी यांनी मांडली. माझे चौथी पर्यंतचे शिक्षण कोकणात झाले. पण गावगाड्याचा परिचय मला राशिनला गेल्यावर परिचय झाला. डॉ. कुमारच्या नेतृत्वाखाली आमची पाठशाळा झाली. डॉ. कुमार आम्हाला बोलकं करायचा. जनता पार्टीचे विचार आपल्या विचारांशी जुळत नाही हे पाहून डॉ. कुमारने वेगळे काम सुरू केले.
सुशिला मोराळे म्हणाल्या की, मराठवाड्यावर नेहमीच अन्याय झाला. विकासाचा अनुशेष कधीच भरला गेला नाही. शाहीर अमर शेख यांचा कार्यक्रम ऐकला. डॉ. कुमार सप्तर्षी, राम बापट, वसुधा सरदार, गोविंद केंद्रे, भालचंद्र मुणगेकर यांच्या सारख्या विचारवंतांसोबत चर्चा व्हायच्या. युक्रांद मधील विचारांनी मला घडवले. मी शेतकऱ्याची मुलगी. आंदोलनात उतरले. लग्न झालेले नव्हते. एक पाय कालेजात दुसरा आंदोलनात. मला २२ दिवस तुरुंगवास घडला. विचार मंथन व्हायचे. यातून जातमुक्तीचा लढा उभा राहिला. अनेकांचे आंतरजातीय विवाह झाले आणि ते टिकलेही. डॉ. कुमारकडे लोकांना मोहिनी घालण्याची जादू होती.
अंजली सोमण – सत्याग्रही विचारधारा मधून त्यांच्या सोबत काम करत असताना त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व उलगडत गेले. माणसांना जोखणे, जोडणे आणि हाताळणी करणे त्यांना चांगले जमायचे.
ओसामा बिन लादेनला मारले त्यावेळी भस्मासुराचा अंत हा अंक सत्याग्रही विचारधारा ने काढला. डॉ. सप्तर्षी त्यावेळी बाहेर होते. त्यांनी अंक पाहिल्यावर ते म्हणाले की, मुखपृष्ठावरील लादेनचे काढलेले मोठे चित्र त्यांना खटकले. त्यांच्याकडे दुरदृष्टी होती. त्यांनी मला माझी चुक सौम्य शब्दात समजावून सांगितली. डॉक्टरांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा विशेषांक प्रकाशित करणार आहे. डॉक्टर स्मरणातूंन जाणार नाहीत. त्यांनी दिलेले आदर्श समोर राहतील.
अॅड. गोपाळ गुणाले – डॉक्टरांनी आम्हाला आक्रमक अहिंसा शिवली. निर्भिड बनवले. ढोंगी समाजवादी खुप पाहिले. पण सप्तर्षी अपवाद होते. त्यांचे बोलणे आणि कृती एक होती.
विकास लवांडे – नविन युक्रांद २००१ ला सुरू झाली. त्यावेळी ग्रामसभा सक्षम करण्याचे अभियान सुरू केले. युक्रांदची पहीली शाखा माझ्या गावात सुरू झाली. विचार आणि कृती मध्ये मेळ पाहिजे. विचार जगता आले पाहिजे. आम्ही कधी जातीय अस्मिता बाळगली नाही. मी नैतिक दृष्ट्या श्रीमंत आहे. नेतिक अधिष्ठान निर्माण करायचे हे मी डॉक्टरांकडून शिकलो. युक्रांद हा विचार जगणे हीच डॉक्टरांना श्रध्दांजली ठरेल.
अंजली कुलकर्णी म्हणाल्या की, शंकराचार्यांशी डॉक्टरांचा झालेला जाहीर वाद मी पाहिला आहे. तेव्हा पासून आम्ही डॉक्टरांच्या विचारधारे सोबत आहोत. शंकराचार्यांनी वादात सांगितले की, १९७२ ला जो दुष्काळ पडला तो लोकांच्या कर्मामुळे. मात्र डॉक्टर विज्ञान, तर्काला धरून बोलत होते. त्यामुळे शंकराचार्यांची चिडचिड झालेली आम्ही पाहिली. पारंपरिक घरातून आलेल्या माझ्यासाऱख्या मुलीला वेगळा दृष्टीकोन मिळाला. मी पुरोगामी झाले.
माझी मैत्रीण म्हणाली, आम्हाला बंदुकीचे प्रशिक्षण द्या. तेव्हा ते म्हणाले मत परीवर्तन करा. माणुस मारून काही होत नाही.
अन्वर राजन म्हणाले की, डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विषयी झालेल्या मांडणीतून विचार मंथन झाले आहे. त्यातून पुढे जाण्याची दिशा मिळेल. युक्रांदच्या कार्यकर्त्यांनी आपल्यासमोर जे आव्हान आहे ते लक्षात घेऊन पुढील वाटचाल करावी. ज्यांना डॉ. सप्तर्षींच्या आठवणी बद्दल लिहायचे आहे त्यांनी ते अवश्य लिहावे.
तेजस भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.
ओहोटीच्या समुद्राला भरती असताना, आमच्यासारख्याची शिडं नसलेली गलबतं,
डॉ. कुमार तु किना-याला लावण्याचा प्रयत्न केलास
तुझ्या गुणाचं दान स्विकारण्याची कुवत आमच्या ओंजळीतही नाहीये. पण कोणी सांगावा, भविष्यावर तुझाही विश्वास नव्हता. भविष्याच्या विरुध्द शिकवले होते. पण कोणी सांगावा, भविष्यात या तळहाताच्या रेषा कशा बदलतील. पण एकच सांगते डॉ. कुमार,
बदलणा-या प्रत्येक भाग्योदयी भविष्य रेषेवर तुझी स्मृती कायम राहील.
सुशिला मोराळे यांनी डॉक्टर सप्तर्षी यांच्या विषयी भावना व्यक्त करताना केलेल्या या काव्यमय मांडणीला श्रोत्यांनी टाळ्यातून दाद दिली.

