आता ‘मद्या’वरही ‘एफडीए’चे लक्ष:तुकाराम मुंढे यांचा इशारा

Date:

खानपानाच्या गुणवत्तेत तडजोड खपवून घेणार नाही

पुणे- ‘खाद्यपदार्थांप्रमाणेच मद्य आणि मद्यार्क नसलेल्या पेयांमध्ये भेसळीच्या तक्रारी वाढल्या असून, गावठी दारूमध्ये विषारी रसायन मिसळल्याने मृत्यू झाल्याच्या घटना पुण्यात घडल्या आहेत. पेयजलांची गुणवत्ता, त्याचे उत्पादन आणि लेबलिंग यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. दूध, पनीर, खाद्यतेलांप्रमाणेच ‘अल्कोहोलिक’ आणि ‘नॉन अल्कोहोलिक’ पेयांचीही तपासणी करणार असून, खानपानाच्या गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,’ असा खरमरीत इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी दिला.

‘प्रत्येक तरुणाने स्वतःची स्वप्ने, सद्विवेक आणि अंतरात्म्याला ‘फॉलो’ केले पाहिजे. केवळ प्रवाहासमवेत न वाहता समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे प्रयत्न केले पाहिजेत,’ अशा प्रेरक शब्दांत त्यांन ‘जेन झी’ पिढीला ‘बी युवरसेल्फ’चा मंत्र देखील दिला.

‘पुणे लोकल’ आणि ‘माय जनसेवक’ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘भविष्यवेध – संवाद भविष्याचा’ या उपक्रमांतर्गत ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप आणि वरिष्ठ पत्रकार प्रशांत आहेर यांनी मुंढे यांची मुलाखत घेतली. तुकाराम मुंढे यांचे वरिष्ठ बंधू अशोक मुंढे, विश्वेश्वर बँकेचे अध्यक्ष सुनील गाडवे, वी फाऊंडेशनच्या शामला देसाई, आम्रपाली चव्हाण, दिनेश कदम आदी उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी आपल्या बालपणापासूनचा खडतर प्रवास, यूपीएससीतील अपयश आणि यश, प्रशासकीय कारकीर्दीतील कठोर निर्णय आणि अन्न सुरक्षेशी संबंधित धोरणांवर मनमोकळे भाष्य केले.

‘खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. चरबीयुक्त, खारट आणि साखरयुक्त पदार्थ खाल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणासारखे आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच कायद्याने ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणेच खाद्यपदार्थ असले पाहिजेत. भेसळयुक्त अन्न, विषारी ताडी-दारू आणि निकृष्ट अन्नपदार्थ नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. ‘एफडीए’ने तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक सुरू केला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हायकोर्टाच्या कँटीनपासून ते शासकीय कार्यालयांपर्यंत सर्वत्र नियमानुसारच तपासणी सुरू आहे. अन्न उद्योगाने नियमांचे पालन करणे, एफडीएने नियमन करणे आणि ग्राहकांनी सजग राहणे यातूनच ही व्यवस्था बदलेल,’ असे आवाहन मुंढे यांनी केले.

तरुणाईला मार्गदर्शन करताना मुंढे म्हणाले, ‘फक्त यशाकडे पाहू नका, तर अपयशातूनही शिकण्याचा प्रयत्न करा. कोणाचे अंधानुकरण करू नका, तर प्रत्येकाकडून चांगले गुण शिका आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. डिजिटल युगात तरुण पिढीचा ‘अटेंशन स्पॅन’ अवघ्या आठ सेकंदाचा झाला आहे आणि स्क्रीन टाइम ८-९ तासांवर गेला आहे. त्यामुळे केवळ सोशल मीडियावर रील्स स्क्रोल करू नका, तर विचार करा. कष्टाची तयारी ठेवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. प्रवाहातील लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे वाहून न जाता जिवंत माणसाप्रमाणे ध्येयाकडे वाटचाल करा. परिस्थिती कशीही असली, तरी तुमचे भविष्य हे तुम्ही आज घेतलेल्या निर्णयांवरच अवलंबून असते.’

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अरविंद जगताप यांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय प्रवासावर आणि व्यतिमत्त्वावर लिहिलेल्या विशेष पत्राचे भावनिक वाचन केले. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अशोक मुंढे आणि अमित रुके यांनी मनोगत व्यक्त केले. विरेश आंधळकर यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.

बदल्यांचा त्रास होत नाही

वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे मला त्रास होत नाही. उलट बदल हा प्रगतीचा अविभाज्य भाग असून, माझ्या जितक्या जास्त बदल्या होतील, तितके अधिक सकारात्मक बदल घडतील,’ अशी रोखठोक भूमिका तुकाराम मुंढे यांनी मांडली.

बीयर आणू का?’ या प्रश्नाने दिल्ली सोडली

‘यूपीएससी’च्या तयारीदरम्यान १९९६ मध्ये पहिल्यांदा दिल्लीला गेल्याचा किस्साही त्यांनी सांगितला. ‘दिल्लीतील जवाहर बुक डेपोमधून पुस्तके घेतल्यानंतर पहाडगंजमधील एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्या वेळी वेटरने ‘बीयर आणू का?’ असे विचारताच मला संताप आला. मी तातडीने बॅग पॅक केली आणि रेल्वे स्थानक गाठले. तिकीट नसतानाही कर्नाटक एक्स्प्रेसचे जनरल तिकीट काढून टॉयलेटजवळ बसत भुसावळपर्यंत प्रवास केला आणि तेथून बसने संभाजीनगर गाठले,’ असे त्यांनी सांगताच सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

आता ‘स्ट्रीटफूड’ खाल्ले तर घसा बसेल

”बीए झाल्यानंतर एमए राज्यशास्त्र प्रवेशासाठी मी पहिल्यांदाच ‘लालपरी’ एसटीने पुण्यात आलो होतो. शिवाजीनगर बसस्थानकावरून पुणे विद्यापीठात पायी गेलो. प्रवेश मिळत होता, परंतु वसतिगृह उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्या सायंकाळी मला निराश होऊन परत जावे लागले. नंतर यूपीएससीच्या तयारीदरम्यान जयकर ग्रंथालय आणि रानडे इन्स्टिट्यूटच्या ग्रंथालयात अभ्यास केला. मित्राच्या खोलीवर ‘पॅरासाईट’ म्हणून राहताना ढेकणांमुळे रात्र-रात्र झोप यायची नाही. त्या काळात चायनीज गाड्यांवर मी आयुष्यात पहिल्यांदा चायनीज खाल्ले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘एमए’ करताना परिस्थितीमुळे ऑम्लेट-पाव आणि फरसाण-केळी हेच ‘स्टेपल डाएट’ होते. आता मी ते ‘स्ट्रीटफूड’ खाल्ले तर माझा घसा बसेल,’ अशी आठवण तुकाराम मुंढे यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

शाळेतच पहिला ‘बदली’चा अर्ज

तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या प्रतिमेशी जोडलेला एक रंजक किस्साही यावेळी समोर आला. ‘ताडसुर्णा गावातील शाळेत आठवीत असताना भूगोलाचा एकही धडा शिकविला जात नसल्याची तक्रार आम्ही शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. ‘आम्हाला या शिक्षकाची बदली पाहिजे,’ असा ‘आदेश’ असे लिहिलेला अर्ज आपण केला होता आणि त्यानंतर त्या शिक्षकाची बदलीही झाली,’ अशी आठवण त्यांनी सांगितली.

कोणत्याही व्यक्तीपेक्षा व्यवस्था महत्त्वाची आहे. व्यवस्थेने नियमांनुसार काम केले पाहिजे. अधिकारी येतील-जातील; मात्र व्यवस्था व्यवस्थित चालण्यासाठी उत्तरदायित्व आणि कार्यपद्धतीची संस्कृती विकसित झाली पाहिजे. त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसमवेत नागरिकांचेही योगदान महत्त्वाचे आहे.

  • तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे : सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत

खामगावातील पारधी-आदिवासी आश्रमशाळेतील तीन भव्य क्रीडा संकुलांची पुण्यातील अमनोरा...

नाटक समाजाचा आरसा – प्रा. गणेश चंदनशिवे

मुक्त विद्यापीठात माजी विद्यार्थी मेळावा - सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न नाशिक...