नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2026
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभागाने ‘एएईआरआय व्हेरीफाय या सुविधेचा प्रारंभ करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या भारतातील शिक्षण प्रतिनिधींच्या संघटनेसोबत (AAERI – Association of Australian Education Representatives in India) भागीदारी केली आहे. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही एका मोठी दिलासादायक घडामोड ठरली आहे.
हे एक डिजीटल व्यासपीठ असून, ते थेट डिजीलॉकरशी (DigiLocker) जोडलेले असणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठांमध्ये अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, ओळखीशी संबंधीत आणि आर्थिक दस्तऐवजांची सुरक्षित, कागदविरहित आणि संमतीवर आधारित पडताळणी करणे शक्य होणार आहे. 7 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीत पार पडलेल्या एएईआरआयच्या वार्षिक अधिवेशनात या मंचाचा अधिकृत प्रारंभ करण्यात आला.
एएईआरआय ने राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभागाच्या सहकार्याने एएईआरआय व्हेरीफाय या व्यासपीठाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे व्यासपीठ म्हणजे मूळ स्रोताकडूनच पडताळणी करून घेणारा एक प्रमाणीकरण सेवेसाठीचा मंच आहे. ऑस्ट्रेलियातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची सुलभ आणि जलदगतीने तपासणी करता यावी हे या व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे. या सुविधेअंतर्गत विद्यार्थी आपल्या डिजीलॉकरला एएईआरआय व्हेरीफाय मंचाशी जोडू शकतात, आणि त्या माध्यमातून मूळ आणि प्रमाणीकरण झालेले डिजिटल दस्तऐवज थेट आणि सुरक्षितपणे सामायिक करू शकतात. यामुळे दस्तऐवजांच्या प्रत्यक्ष प्रतींवरचे तसेच हाताने कराव्या लागणाऱ्या पडताळणी प्रक्रियेवरचे अवलंबित्व कमी होणार आहे.ही डिजिटल कार्यपद्धती नव्याने सुरु करण्यात आली असली तरी देखील, या आधी हाताने केल्या जाणाऱ्या आणि धीम्या गतीने होणाऱ्या दस्तऐवजांच्या पडताळणीऐवजी हीच कार्यपद्धती लागू होईल. यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे दोन धोरणात्मक टप्प्यांमध्ये विभागलेली एक सुरक्षित टप्प्यांची आखणीही केली गेली आहे.:
टप्पा 1: विद्यार्थी तपासणी – या टप्प्याअंतर्गतची तपासणी ही विद्यापीठातील अर्ज प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच सुरळीतपणे पार पाडली जाईल.
टप्पा 2: प्रायोजकांची तपासणी – विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मान्यता मिळाल्यानंतर लगेचच आर्थिक दस्तऐवजांची अस्सलता तपासण्यासाठी ही प्रक्रिया सुरू केली जाईल.
या सुविधेअंतर्गत विद्यार्थ्याच्या स्पष्ट संमतीने, डिजीलॉकरद्वारे मूळ वितरक प्राधिकरणांनी स्वाक्षरीकृत केलेल्या डिजिटल नोंदी थेट ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे फसवणुकीचा धोका पूर्णपणे टाळला जाणार आहे, तसेच माहितीची गोपनीयताही राखली जाणार आहे. यासोबतच अर्जांवर प्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या वेळेतही मोठी घट होणार आहे.

