शहर सुधारणा समितीची मान्यता; 1.67 कोटींचा मोबदला मिळणार, पार्किंग आणि बस बेची अट कायम
पुणे : पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-1 अंतर्गत स्वारगेट ते कात्रज या भूयारी मार्गावरील कात्रज मेट्रो स्थानकाच्या प्रवेश आणि निर्गम द्वारासाठी कात्रज चौकातील पुणे महापालिकेच्या मालकीची 592.64 चौरस मीटर जागा महामेट्रोला मालकी हक्काने हस्तांतरित करण्यास शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे.
महापालिका प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव शहर सुधारणा समितीसमोर ठेवला होता. समितीने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असून, संबंधित जागेच्या मोबदल्यापोटी महामेट्रोकडून पुणे महापालिकेला 1 कोटी 67 लाख 83 हजार 565 रुपये मिळणार आहेत. हा प्रस्ताव आता पुढील मंजुरीसाठी स्थायी समिती आणि मुख्य सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.
कात्रज चौकातील जुना सर्वे क्रमांक 138, नवीन सर्वे क्रमांक 85 मधील 592.64 चौरस मीटर जागा सध्या सार्वजनिक पार्किंगसाठी वापरली जाते. स्वारगेट-कात्रज भूयारी मेट्रो मार्गावरील कात्रज स्थानकाचे प्रवेश आणि निर्गम द्वार याच ठिकाणी उभारण्यात येणार असल्याने ही जागा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याची मागणी महामेट्रोने महापालिकेकडे केली होती.
ही जागा भूसंपादन कायद्यान्वये 1 नोव्हेंबर 1975 रोजी जकात नाक्यासाठी संपादित करण्यात आली होती आणि त्यानंतर ती पुणे महापालिकेच्या ताब्यात आली.
पार्किंग आणि बस स्थानकाची क्षमता कमी होणार नाही
जागा महामेट्रोला हस्तांतरित करताना नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने दोन महत्त्वाच्या अटी घातल्या असून, शहर सुधारणा समितीने त्यांनाही मान्यता दिली आहे.
पहिल्या अटीनुसार, सध्या उपलब्ध असलेल्या सार्वजनिक पार्किंग तसेच PMPML बस स्थानकाची क्षमता कोणत्याही परिस्थितीत कमी करता येणार नाही. मेट्रोच्या प्रस्तावित बांधकामात किमान तळमजला, G, G-1 किंवा G+1 या स्तरांवर आवश्यक पार्किंगची व्यवस्था करावी लागणार आहे. या पार्किंगसाठी मुख्य रस्त्यावरून स्वतंत्र प्रवेश आणि निर्गम मार्गही ठेवावा लागेल.
दुसऱ्या अटीनुसार, PMPML बसेसची ये-जा सुरळीत राहावी यासाठी नव्या बांधकामामध्ये विद्यमान बस बेचा समावेश करणे महामेट्रोला बंधनकारक राहणार आहे.
शासन निर्णयानुसार ही जागा हस्तांतरित केली जाणार आहे. सन 2026-27 च्या शिरस्तेदारीप्रमाणे खुल्या जागेसाठी प्रतिचौरस मीटर 82 हजार 320 रुपये दर निश्चित करण्यात आला असून, त्यानुसार या जागेचे एकूण मूल्य 1 कोटी 67 लाख 83 हजार 565 रुपये ठरविण्यात आले आहे. ही रक्कम महामेट्रोमार्फत महापालिकेच्या आर्थिक दाखल्यातून समायोजित केली जाणार आहे.
दरम्यान, पुणे मेट्रोच्या टप्पा-1 साठी महापालिकेच्या मालकीच्या सुमारे 20 जागा यापूर्वीच भाडेपट्ट्याने देण्यात आल्या आहेत. मात्र कात्रज मेट्रो स्थानकाचे काम वेगाने पूर्ण व्हावे आणि प्रवेश-निर्गमाची कायमस्वरूपी व्यवस्था करता यावी, यासाठी कात्रज चौकातील ही जागा महामेट्रोला मालकी हक्काने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

