उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांची महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे मागणी
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या विविध खात्यांकडून भूमिगत सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांचे रिईनस्टेटमेंट करण्यासाठी काढण्यात आलेल्या सुमारे ७५ कोटी रुपयांच्या तीन निविदांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या निविदांमध्ये १२० TPH क्षमतेच्या हॉट मिक्स प्लांटची अट असताना संबंधित ठेकेदाराकडे प्रत्यक्षात ९० TPH क्षमतेचा प्लांट असल्याचा आरोप करण्यात आला असून, संपूर्ण निविदा प्रक्रियेची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन दिले आहे.
केसकर, कुलकर्णी आणि बधे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पुणे शहरातील रस्त्यांचे रिईनस्टेटमेंट करण्यासाठी प्रत्येकी सुमारे २५ कोटी रुपयांच्या तीन निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदांमध्ये देवकर अर्थमूव्हर्स यांनी १२० TPH क्षमतेच्या हॉट मिक्स प्लांटची कागदपत्रे सादर केल्याचा दावा आहे. मात्र, प्रत्यक्ष जागेवर ९० TPH क्षमतेचा प्लांट उभारण्यात आल्याचा आरोप समोर येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हा आरोप सत्य असल्यास निविदा प्रक्रियेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात, असे या तिघांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे. निविदेत १२० TPH क्षमतेच्या प्लांटची अट असताना ९० TPH क्षमतेचा प्लांट कसा स्वीकारण्यात आला, संबंधित प्लांटची प्रत्यक्ष पाहणी कोणी केली, त्याची क्षमता कोणत्या अधिकाऱ्यांनी तपासली आणि कागदपत्रांची पडताळणी करून ठेकेदाराला पात्र कसे ठरविण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निविदेतील तांत्रिक अटींचे उल्लंघन झाले असल्यास आजपर्यंत संबंधितांवर कारवाई का करण्यात आली नाही, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणात केवळ ठेकेदाराचीच नव्हे, तर निविदेतील कागदपत्रांची छाननी करणारे, प्रत्यक्ष पाहणी करणारे आणि अंतिम मंजुरी देणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या भूमिकेचीही निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. चौकशीत कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याचे संगनमत किंवा निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
देवकर अर्थमूव्हर्स यांनी निविदेसोबत सादर केलेली कागदपत्रे, प्रत्यक्ष उभारण्यात आलेल्या हॉट मिक्स प्लांटची क्षमता, त्याचे कॅलिब्रेशन प्रमाणपत्र तसेच संपूर्ण निविदा प्रक्रिया यांची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
चौकशीत १२० TPH ऐवजी ९० TPH क्षमतेचा प्लांट असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदाराला अपात्र घोषित करून नियमानुसार कारवाई करावी. त्याचबरोबर या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“पुणेकरांच्या कराच्या पैशावर कोणालाही डल्ला मारू दिला जाणार नाही,” अशी भूमिका उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी निवेदनातून मांडली आहे.
दरम्यान, हे सर्व आरोप निवेदनातून करण्यात आले असून संबंधित ठेकेदार अथवा पुणे महापालिका प्रशासनाची बाजू उपलब्ध झाल्यानंतर तीही महत्त्वाची ठरणार आहे.

