परदेशात नोकरीचे आमिष; ११ लाखांची फसवणूक करून महिलेला पोर्तुगालमध्ये विकल्याचा आरोप

Date:

सुपरमार्केटमध्ये दीड लाख पगाराच्या नोकरीचे आश्वासन; पुण्यातील एजंटांसह पोर्तुगालमधील सात जणांवर विमानतळ पोलिसांत गुन्हा

पुणे : परदेशात सुपरमार्केटमध्ये नोकरी आणि दरमहा दीड लाख रुपये पगाराचे आमिष दाखवून नागपूरमधील एका २८ वर्षीय महिलेकडून तब्बल ११ लाख रुपये घेतल्याचा आणि त्यानंतर तिला पोर्तुगालमध्ये नेऊन एका बिअर विक्रेत्याकडे बेकायदेशीर कामासाठी सोपविल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेने तेथून सुटका करून भारतात परतल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रतिमा भाटी, अमितकुमार झा, अजहर शेख, कपिल मिश्रा (सर्व रा. पुणे) तसेच वामसि, चैतन्य आणि हिम्मतसिंग (रा. पोर्तुगाल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या सर्व आरोपांची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील संबंधित महिला इन्स्टाग्रामवर नोकरी शोधत होती. डिसेंबर २०२५ मध्ये तिला विमाननगर येथील फिनिक्स मार्केटसिटी परिसरात कार्यालय असल्याचे सांगणाऱ्या ‘We Migrate’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरील परदेशातील नोकरीसंबंधी व्हिडिओ दिसला. त्यानंतर तिने संबंधितांशी संपर्क साधला.

तिला पुण्यात बोलावण्यात आले. तेथे प्रतिमा भाटी, अजहर शेख आणि कपिल मिश्रा यांची भेट झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन, डेन्मार्क आणि पोलंडमध्ये चॉकलेट कंपनीत कामगार, सुपरमार्केटमध्ये कॅशियर किंवा अकाउंटंट म्हणून नोकरी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. दरमहा सुमारे दीड लाख रुपये पगार, दिवसाला आठ तास काम, आठवड्यात दोन दिवस सुट्टी आणि तीन वर्षांचे वर्क परमिट मिळेल, असे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रक्रियेसाठी ११ लाख रुपये खर्च येईल असे सांगून महिलेकडून टप्प्याटप्प्याने पैसे घेण्यात आले. २४ मार्च २०२६ रोजी तिला परदेशात नोकरी मिळाल्याचे सांगून पुण्यातील कार्यालयात बोलावण्यात आले. तेथे काही कागदपत्रांवर तिच्या सह्या घेण्यात आल्या; मात्र त्याची प्रत तिला देण्यात आली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानंतर २१ मे २०२६ रोजी तिने मुंबई–अबुधाबी–माद्रिद असा विमान प्रवास केला. स्पेनमध्ये पोहोचल्यानंतर वामसि नावाची व्यक्ती तिला घेण्यासाठी आल्याचे सांगण्यात आले. पुढे तिला पोर्तुगालमध्ये नेऊन एका घरात ठेवण्यात आले. तेथे तिचा पासपोर्ट ताब्यात घेण्यात आला आणि काही काळ बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. ४० हजार रुपये घेतल्यानंतर पासपोर्ट परत केल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.

यानंतर तिला ओदिमेरा परिसरात एका घरात ठेवण्यात आले. त्या घरात राजस्थान आणि हरियाणातील आणखी दोन महिला राहत असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. सुपरमार्केटमध्ये कॅशियरची नोकरी मिळेल असे सांगितले असताना प्रत्यक्षात तिला बिअर विक्रीच्या दुकानात काम करण्यास लावण्यात आल्याचा आरोप आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांनी दुकानाच्या मालकाने तिला आपल्या सांगण्यानुसारच वागावे लागेल, असे सांगितले. आपण संबंधित एजंटांना पैसे देऊन तिला येथे आणल्याचा दावाही त्याने केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यामुळे आपली गंभीर फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.

तिने पतीशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर २९ जून २०२६ रोजी पहाटे ती तेथून निघाली आणि बसने सुरक्षित ठिकाणी पोहोचली. पुढे लिस्बन आणि माद्रिदमार्गे ती भारतात परतली. तिचा पती दिल्लीला आल्यानंतर दोघे नागपूरला गेले.

भारतामध्ये परतल्यानंतरही संबंधितांकडून तिच्याशी संपर्क साधण्यात आल्याचा आरोप आहे. आणखी तीन लाख रुपये दिल्यास माल्टामध्ये नोकरी लावून देण्याचे आश्वासन देण्यात आले आणि पैसे न दिल्यास तिच्या पतीला खोट्या प्रकरणात अडकविण्याची तसेच गंभीर परिणामांची धमकी दिल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.

या सर्व प्रकारामुळे काही काळ तिने तक्रार दाखल केली नव्हती. त्यानंतर पुण्यात येऊन गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती दिली. प्राथमिक माहितीची पडताळणी केल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

१२० TPH ची अट, प्रत्यक्षात ९० TPH प्लांट ?, ७५ कोटींच्या रस्ते निविदांची चौकशी करा..

उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांची महापालिका...

आरोपींची धिंड काढून सोशल मिडीयावर बढाया:पुणे पोलीस आयुक्तांची सर्व पोलीस ठाण्यांना तंबी

पुणे- आरोपींचा गुन्हा सिद्ध झालेला नसताना ,आरोपी किंवा गुन्हेगार...

‘मिसिंग लिंक’ बोगद्यात मध्यरात्री एक भीषण अपघात-तरुण नेत्याचा मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' बोगद्यात मध्यरात्री एक भीषण...